‘..अन्यथा भाजपची अवस्था शिवसेनेसारखी होईल’; बंडखोर आमदाराने किरीट सोमय्यांना खडसावलं

शिवसेना आणि अपक्ष अशा ५० आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत सरकार स्थापन केलं. मात्र, आम्ही आजही शिवसेनेतच आहोत, असं अनेकदा बंडखोर आमदार सांगताना दिसत आहेत. यासोबत ठाकरे आणि शिवसेनेबद्दल टिका सहन केली जाणार नसल्याचंही याआधीच त्यांनी भाजपला सांगितलं आहे, अशी माहितीही बंडखोरांनी दिली होती. मात्र यानंतरही किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केलं.

किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंचं माफिया सरकार असा उल्लेख यात केला होता. यानंतर बंडखोर आमदारांनी  याला विरोध केला आहे. यावर आता शिंदे गटाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे. शिवसेनेसारखी भाजपची अवस्था होऊ द्यायची नसेल तर किरीट सोमय्यांना आवरलं पाहिजे, असं मत शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केलं.

किरीट सोमय्या यांना भारतीय जनता पक्षाने सांभाळलं पाहिजे. सोमय्या हे सतत ठाकरे परिवारावर टीका करत आहेत. आजही ठाकरे परिवार आमचं दैवत असून पुन्हा आम्हाला काही दुसरा विचार करायला भाग पाडू नका, असा कडक शब्दात इशारा आमदार किशोर पाटील यांनी सोमय्यांना दिला आहे.

शिवसेनेचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सांगताहेत की धनुष्यबाण हे चिन्ह आमचंच आहे. दुसरीकडे शिवसेनेचे गटनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि आमच्या सर्वांचं मत एकच आहे की आम्ही बहुमताने विधानपरिषदेत ठराव पारित केला असून धनुष्यबाण हा आमचा आहे. मात्र शेवटी हा न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आहे, असं मत आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.