मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मध्य प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेतृत्वाने कमलनाथ यांचा राजीनामा स्वीकारला असून डॉ. गोिवद सिंह यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांनी कमलनाथ यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले. २०१८ मध्ये काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत वर्चस्व मिळवल्यानंतर कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. मात्र मार्च २०२० मध्ये काही आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने कमलनाथ यांनी राजीनामा दिला होता. जुलै २०२० मध्ये कमलनाथ यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती.