पिंपरी-चिंचवड मध्ये दृश्यम स्टाईल खून, पत्नीच्या प्रियकराची हत्या

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पतीने विवाहितेच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर मृतदेह हातभट्टीमध्ये टाकून जाळण्यात आला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ चित्रपटाशी साधर्म्य असलेली परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन येथे हा प्रकार घडला.

पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेह दारुच्या हातभट्टीमध्ये जाळून टाकला. मृतदेह संपूर्णपणे जळाल्यानंतर त्या मृतदेहाची हाडे आणि त्यासोबत एक शेळी मारुन तिचा मृतदेह पोत्यात भरला आणि जवळ असलेल्या नाल्यात टाकला. जेणेकरुन पोलिसांची दिशाभूल होईल. मात्र हिंजवडी पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत तिघा जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

पती लंकेश रजपुत उर्फ लंक्या, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन तानाजी रजपुत यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बावधन येथील भूषण चोरगे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर रोजी भरत याने महिलेला तिच्या मोबाईलवर दोन मिस कॉल दिले. त्यावेळी जवळ असलेला पती चिडला आणि त्याने विचारणा करत त्या महिलेला मारहाण सुरु केली. ही मारहाण सुरू असताना त्या महिलेने घरामधून पळ काढला.

त्यावेळी महिलेशी संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर असलेला भूषण चोरगे हा महिलेला भेटण्यासाठी घराजवळ आला. मात्र भरत चोरगे तिथे आल्याचं समजताच महिलेच्या पतीने आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून त्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

भरतचा मृतदेह चारचाकी वाहनातून उरवडे गावामध्ये असलेल्या हातभट्टीमध्ये दोन दिवस जाळला. भरतचा मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख आणि इतर अवशेष हे घोटावडे परिसरातील नाला आणि नदीत टाकून पुरावा नष्ट केला. त्यानंतर मुख्य आरोपी हा मध्य प्रदेशमध्ये पळून गेला.

दरम्यान भूषण चोरगेच्या कुटुंबीयांनी हिंजवडी पोलिसांत तो मिसिंग असल्याची तक्रार दिली. त्याच दिवशी भरत चोरगे याच्या आईला त्याची चप्पल आरोपी लंकेश राजपूत याचा घराजवळ दिसली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे ही लंकेश राजपूतकडे वळवली असता तपासात ही घटना समोर आली.

सर्व आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी हा घटनाक्रम सांगितला. त्यामध्ये ज्यावेळी मयत भूषण चोरगेला दारुच्या भट्टीमध्ये जाळलं, त्यावेळी त्याची हाडं आणि भूषण चोरगेच्या पायामध्ये काही वर्षांपूर्वी डॉक्टरांनी बसवलेला लोखंडी रॉड टाकून दिलेल्या ठिकाणावरुन आरोपीनी दिला. तो हस्तगत करत पोलिसांनी त्यानुसार अधिक तपास सुरु केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.