नाना पटोले यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या 100 हून अधिक ठिकाणी तक्रारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 100 हून अधिक ठिकाणी तक्रारी (एफआयआर) दाखल केल्या आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. पटोले यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहील, भांडारी यांनी नमूद केले. गेल्या तीन दिवसांपासून पटोलेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य केल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे पोलीस आता कुठे गेले, असा सवालही भाजपकडून विचारण्यात येत आहे.

भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करताना पोलिसांनी जो न्याय लावला तोच न्याय लावून पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी भाजपाची मागणी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापलं आहे. तर नाना पटोलेंनी ते वक्तव्य पंतप्रधानांबद्दल नव्हतं मोदी नावाच्या गावगुंडाबाबत होतं, असे म्हटल्याने वेगवेगळे राजकीय तर्क लावले जात आहेत.

मुंबई भाजपा (Bjp) अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा तर्फे मंत्रालय परिसरातील गांधीजींच्या पुतळ्या जवळ साखळी उपोषण करण्यात येत आहे. जोपर्यंत नाना पटोले यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिला. देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो अशा शब्दात गरळ ओकली आहे. नाना पटोले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदारमंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबई तर्फे मंत्रालय परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.