दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा पराभव झाला आहे. मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. खरंतर धवन आणि विराट मैदानावर असताना भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण दुर्देवाने असं होऊ शकलं नाही. भारताच्या पराभवाची काय कारणं आहेत.
भारताची गोलंदाजी अजिबात चालली नाही. जसप्रीत बुमराह, शादुर्ल ठाकूर, भुवनेश्वर, चहल आणि अश्विन पूर्णपणे निष्प्रभ ठरले. बावुमा-डुसे जोडीने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. तिथेच भारताचा विजयाचा मार्ग सोपा नसेल हे स्पष्ट झाले. ज्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. तिथे अश्विन आणि चहल फारसे चालले नाहीत.
कसोटी प्रमाणे इथे सुद्धा फलंदाजीच भारचाच्या पराभवाला कारणीभूत आहे. विराट-धवनमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी झाली. खरंतर हे दोघे खेळपट्टीवर असे पर्यंत भारत सहज जिंकेल असे चित्र होते. पण हे दोघे बाद होताच डाव गडगडला. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फ्लॉप ठरले.
केएल राहुलकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. पण त्याची रणनितीच समजत नाही. वेंकटेश अय्यरला ऑलराऊंडर म्हणून संघात घेतलं. पण त्याला एक ओव्हरही दिली नाही. प्रमुख गोलंदाज बावुमा-डुसे जोडीपुढे निष्प्रभ ठरत असताना वेंकटेश अय्यरला संधी देऊन पाहायला हरकत नव्हती.