राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असं विधान शरद पवरांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवारांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओचा दाखला देत राष्ट्रीय पक्षांची यादीच वाचली. त्यातून शरद पवारांनी सध्याच्या या राजकीय घडामोडींमागे भाजपच असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं.
“बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचं फक्त कारण दिलं. छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत 12 ते 15 जण होती. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारांना निधीचा मुद्दा सांगितला आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून विधान केलं असावं. इथून प्रत्यक्ष लोक हलवणं आणि ऑपरेशन करणं यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. अजित पवारांना इतकी माहिती जरुर आहे. पण गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती (राज्याच्या बाहेरची) आम्हाला अधिक माहिती. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं विधान केलं आहे. माझ्याकडे सर्व राष्ट्रीय पक्षांची यादी आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, कम्युनिस्ट पार्टी, सीपीएन ही सहा अधिकृत पक्षांची यादी आहे. या सगळ्यांचा यात हात आहे का? जे नाहीत याचा विचार केला तर कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“सुरतला आणि आसामला जी व्यवस्था करणारे आहेत ते अजित पवारांच्या ओळखीचे आहेत, असं मला वाटत नाही. सुरतला बंडखोर नेत्यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचा पाठिंबा होता. तिथे भाजपचं सरकार आहे. तिथे कोण आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही”, असंदेखील शरद पवार म्हणाले.
“अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केलं. अनेक वर्षांचे रखडलेले निर्णय घेतले. सध्या एक संकट असताना त्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य खात्याने उत्तम काम केलं. ते सगळं बघितल्यानंतर हा प्रयोग फसलाय, असं म्हणणं म्हणजे हे राजकीय अज्ञान आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
“प्रसिद्धी माध्यमातील काही गोष्टी खऱ्या आहेत त्या नाकारण्याचं कारण नाही. पण ज्यावेळेला विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत ते इथे आल्यानंतर माझी खात्री आहे त्यांना ज्या पद्धतीने नेलं गेलं याची वस्तूस्थिती सांगतील. इथे आल्यानंतर आपण अजूनही शिवसेनेबरोबर आहोत हे स्पष्ट करतील आणि बहुमत कुणाचं आहे हे सिद्ध होईल. अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी अनेकदा बघितलेली आहे. या परिस्थितीवर मात करुन हे सरकार बहुमत सिद्ध करेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार चालू आहे हे देशाला कळेल”, असं शरद पवार म्हणाले.