देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाची लाट पसरली आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिरंगा ध्वजाची खरेदी करण्यात येत आहे. तुम्हीदेखील यासाठी तिरंगा आणणार असाल, तर काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. मुळात, राष्ट्रीय ध्वजासंबंधी असलेले नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच नियमांची माहिती येथे देत आहोत. ‘TV9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
राष्ट्रध्वजाच्या बाबतीत हे नियम नक्कीच पाळा
राष्ट्रध्वज फडकवताना तो नेहमी सरळच फडकवावा. म्हणजेच केशरी रंगाची पट्टी नेहमी वरच्या बाजूला यायला हवी. खराब झालेला किंवा फाटलेला राष्ट्रध्वज फडकवू नये. कोणत्याही व्यक्तीला वा वस्तूला सलामी देताना राष्ट्रध्वज खाली झुकणार नाही याची खबरदारी घ्या. राष्ट्रीय ध्वजाच्या आजूबाजूला किंवा त्याच्या वर दुसरा कोणताही ध्वज फडकवू नये. तसंच, जिथे ज्या खांबावर राष्ट्रध्वज फडकवला जाईल त्यावर फुलांचा हार किंवा अन्य वस्तू ठेवली जाऊ नये. राष्ट्रीय ध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी केला जाऊ नये. राष्ट्रध्वजाचा जमिनीला किंवा पाण्याला स्पर्श होऊ नये. ज्या ठिकाणी राष्ट्रध्वजाला हानी पोहोचू शकते, अशा ठिकाणी किंवा स्थितीमध्ये राष्ट्रध्वज फडकवू नये. एकाच खांबावर राष्ट्रध्वजासह अन्य ध्वज फडकवू नयेत. वक्त्याचं टेबल झाकण्यासाठी किंवा व्यासपीठावर गुंडाळण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करू नये.
राष्ट्रध्वज खराब झाल्यानंतर काय करावं?
भारतीय ध्वज संहितेतल्या नियम 2.2 नुसार, कापडी राष्ट्रध्वज खराब झाल्यास किंवा त्याचा रंग फिका झाल्यास तो वापरणं टाळावं. असं न केल्यास तो तिरंग्याचा अपमान समजला जातो. अशा वेळी खराब झालेल्या राष्ट्रध्वजास वेगळ्या जागी नेऊन पूर्णपणे नष्ट करणं गरजेचं आहे. एक तर पूर्णपणे जाळून किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही खराब ध्वज नष्ट करू शकता.
यासोबत कागदी झेंड्यांसाठीही वेगळा नियम आहे. कागदी झेंडे कधीही जमिनीवर टाकू नयेत. वापर झाल्यानंतर एक तर हे झेंडे सांभाळून ठेवावेत किंवा मग वाहत्या पाण्यात ते समर्पित करावेत.
तिरंग्याचा अपमान नको
राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी गृहमंत्रालयाकडून काही नियम जारी करण्यात आले आहेत. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971’नुसार काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. यानुसार, खासगी अंत्यसंस्कार करत असताना राष्ट्रध्वजाचा आच्छादन म्हणून वापर करता येत नाही. राष्ट्रध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारचा पोशाख वा गणवेश बनवण्यासाठी केला जाऊ नये. तसंच रुमाल, उशी किंवा अन्य कोणत्याही ड्रेस मटेरिअलवर भरतकाम करून किंवा छापलेल्या स्वरूपात तो असू नये. राष्ट्रध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू गुंडाळण्यासाठी, पॅकिंगसाठी किंवा वाटप करण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केला जाऊ नये. कोणत्याही वाहनाची बाजू, वरचा भाग किंवा मागची बाजू झाकण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केला जाऊ नये.
एका नियमात शिथिलता
ध्वजसंहितेनुसार सायंकाळी सहा वाजल्यानंतर राष्ट्रध्वज फडकवण्यास मनाई आहे; मात्र सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्यामुळे या नियमातून दोन दिवसांसाठी सूट देण्यात आली आहे. घरोघरी 13 ऑगस्टला फडकवलेले राष्ट्रध्वज 15 ऑगस्टला उतरवावेत, असं सरकारने म्हटलं आहे.