सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना मोठ्या अडचणीत सापडली आहे. शिंदे गटाने सत्ता स्थापनेचा दावा केला तर अल्पमतात असलेलं ठाकरे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्ह घेतलं, त्या दिवशी ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. 21 किंवा 22 तारखेलाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे.
मात्र महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ही कायदेशीर प्रक्रिया नको होती, त्यामुळे ते तेव्हाच राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ज्येष्ठ नेत्याच्या सल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे ठेवला. उद्धव ठाकरेंना त्या दिवशी पहिल्यांदाच फेसबुक लाइव्ह घ्यायला उशिर झाला होता. चर्चेमुळे हा उशिर झाला असू शकतो.
सुत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. 21 तारखेला सायंकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हच्यावेळी महाविकास आघाडीच्या एक ज्येष्ठ नेत्यामुळे राजीनामा रोखण्यात आला. पुन्हा 22 तारखेला 12.30 वाजता सचिवांची बैठक बोलावली होती. तेव्हा राजीनामा देणार होते. मात्र तेव्हा देखील महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यामुळे राजीनामा दिला नाही, अशी माहिती समोर आली आहे. शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं असंही काहीचं म्हणणं आहे.