प्रति सेनाभवन उभं राहणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारे निर्णय आणि वक्तव्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेला सर्वात मोठा झटका देणारा निर्णय एकनाथ शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. पण हे प्रति सेनाभवन नसून मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभरण्यात येणार असल्याची माहिती सरवणकर यांनी दिली आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिंदे गटाचं दादरमध्ये मुख्य कार्यालय असेल. त्यानंतर मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागामध्ये कार्यालय उभारण्यात येतील, अशी माहिती सरवणकर यांनी दिली. शिंदे गटाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गट आता दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार, अशी चर्चा रंगली आहे. शिंदे गटाने दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणं हे त्यांच्यासाठी सोपं काम असलं तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या सेनाभवनाला जो इतिहास आहे तो इतिहास या नव्या प्रति सेनाभवनाला नसणार हे सत्य नाकारता येणार नाही.

बाळासाहेबांनी उभारलेल्या शिवसेना भवनाचा इतिहास

महाराष्ट्राच्या इतिहासात शिवसेनेला विसरता येणार नाही. शिवसेना ही पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारली असली तरी या संघटनेला ज्येष्ठ लेखक प्रबोधनाकर ठाकरे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं योगदान होतं. त्यांचा वारसा पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु ठेवला होता. बेळगाव महाराष्ट्रात सामील व्हावं यासाठी शिवसेनेने पुकारलेला लढा हा महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील असाच आहे. याच शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना भवनाचं उद्घाटन आणि तिथून ते आज प्रति सेनाभवन उभारण्यापर्यंतचा पक्षाचा प्रवास हा खडतर आणि आव्हानात्मक राहिला आहे.

शिवसेनेच्या सेनाभवनावर दहशतवाद्यांचा देखील डोळा होता. दहशतवाद्यांनी सेनाभवनावर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. याशिवाय आणीबाणीच्या काळात सेनाभवनावर हल्ला देखील झाला होता. मुंबईवर जेव्हा संकटं आली तेव्हा सेनाभवनावरही आली. मग तो 1993 साखळी बॉम्बस्फोट असेल किंवा 26/11 चा दहशतवादी हल्ला. 26/11 च्या हल्ल्यावेळी देखील दहशतवाद्यांनी सेनाभवनाची रेकी केल्याची माहिती उघड झाली होती. या सेनाभवनाने खूप काही पाहिलं. कधी बॉम्बस्फोट पाहिला, कधी हल्ला झेलला, कधी राजकीय संघर्ष पाहिला, राडा पाहिला, कधी रॅली तर कधी आंदोलनं पाहिली. पण सेनाभवन कायम उभं राहिलं. या सेनाभवनाची 2006 साली पुनर्बांधणी झाली होती. त्यानंतरपासून सेनाभवन तसंच आहे. पण आता या सेनाभवनाला वेगळा पर्याय उभा राहणार आहे. कारण सेनाभवन असणाऱ्या परिसरातच दादरमध्ये शिंदे गटाचं प्रति सेनाभवन उभारलं जाणार आहे.

सेनाभवनाचा इतिहास

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 19 जून 1966 या दिवशी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना स्थापन केल्यानंतर संघटनेचं कार्यालय देखील असणं गरजेचं होतं. त्यामुळे मूंबईतल्या पर्ल सेंटरच्या दोन खोल्यांमध्ये शिवसेनेचं कार्यालय सुरु करण्यात आलं. बाळासाहेब तिथूनच संघटनेचं कामकाज चालवायचे. सर्वसामान्य बाळासाहेबांकडे आपल्या समस्या घेवून तिथेच यायचे. विशेष म्हणजे त्यावेळी बाळासाहेबांच्या निवासस्थानाला देखील कार्यालयाचं रुप आलं होतं. पण पक्ष विस्तारल्यानंतर कार्यालयाची गरज भासली. त्यातूनच शिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेना भवन कसं उभारण्यात आलं किंवा दादरमध्ये शिवाजी पार्कजवळच हे कार्यालय का उभारण्यात आलं? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत लेखक योगेंद्र यादव यांनी आपल्या ‘समज-गैरसमज’ या पुस्तकात लिहिलं आहे. दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ ऐन मोक्याच्या ठिकाणी शिवसेनेला जागा मिळाली. उमर या मुस्लीम व्यक्तीची ही जमीन होती. आधी तिथे छोटी दुकाने होती. पण सेनाभवन झाल्यानंतर सर्वांना त्या इमारतीत जागा देण्यात आली. गोरे आर्किटेक्टच्या संकल्पनेतून हे भवन उभारण्यात आलं होतं. गड-किल्ल्यांच्या धर्तीवर सेनाभवनाची उभारणी करण्यात आली. आणि अखेर 1974 साली दादरमध्य शिवसेना भवन उभं रहिलं होतं. पण शिवसेनेचं कार्यालय म्हणून त्याचं अधिकृत उद्घाटन 19 जून 1977 रोजी झालं.

1993 च्या बॉम्बस्फोटवेळी शिवसेना भवनाचं नुकसान झालं होतं. शिवसेना भवनाजवळ बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यामुळे सेनाभवनाचं मोठं नुकसान झालं होतं. विशेष म्हणजे 26/11 च्या हल्लाआधी देखील डेव्हिड हेडली या दहशतवाद्याने शिवसेना भवनाची रेकी केली होती, अशी माहिती देखील समोर आली होती. त्यामुळे शिवसेना भवन आधीपासूनच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिलेलं आहे. बॉम्ब हल्ल्यानंतर 2006 साली शिवसेनेची पुनर्बांधणी करण्यात आलं होतं. त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडेदेखील उद्घाटनवेळी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.