कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
काही वेळापूर्वी त्यांचा बीपी काही काळासाठी नॉर्मल झाला होता. त्यांच्या पायात काही प्रमाणात हालचालही झाल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यांच्या प्रकृतीतील हा सुधार फार काळ टिकला नाही. त्यांचा बीपी पुन्हा कमी-जास्त होत आहे. त्यामुळे आता त्यांच्या हृदया ऐवजी त्याचा मेंदू डॉक्टरांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अजूनही त्याचा मेंदू प्रतिसाद देत नाहीय. राजू 43 तासांपेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरवर आहेत.राजूच्या उपचारासाठी कार्डिओलॉजी, क्रिटिकल केअर, गॅस्ट्रोलॉजी टीम तसेच न्यूरोलॉजी टीम तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान राजू श्रीवास्तव याच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी मात्र त्यांच्या निधनाच्या बातम्या या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करा असंही या नोटमध्ये म्हटलं आहे.
राजू श्रीवास्तवला नेमकं काय झालं?
बुधवारी सकाळची जिममध्ये वर्कआउट करताना राजू यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांनतर ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टर चिंतेत आहेत. काल डॉ.अनन्या गुप्ता यांनी सांगितलं होतं की, राजू श्रीवास्तव यांचा बीपी नियंत्रणात येत नाहीय. सामान्यतः अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येते आणि त्याला सामान्य वॉर्डात हलवलं जातं. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांची बीपी 80/56 इतका कायम आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.