बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाशी युती केली आहे. याच युतीच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. एकीकडे नितीश कुमार यांचे सरकार स्थिरावत असताना दुसरीकडे त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत.
बिहारमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘जे लोक बनावट दारू पितात, त्यांचा मृत्यू होणारच’ (जो पियेगा, वो मरेगा!) असं विधान केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी, नितीश कुमारांचा सर्वनाश होणं अटळ आहे, असं विधान केलं आहे. आज ते शिवहरमध्ये आपल्या पदयात्रेची सुरुवात करत होते, यावेळी त्यांनी म्हटले की, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एवढा संवेदनाहीन माणूस मी पाहिला नाही. मला पश्चाताप होतोय की मी २०१४-१५ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारांची मदत केली.”
याशिवाय प्रशांत किशोर म्हणाले, “या अहंकारी माणसाचा सर्वनाश होणं अटळ आहे. करोना महामारीत जेव्हा बिहारमध्ये लाखो लोक भूकेने व्याकुळ होत होते आणि परत आपल्या घरी येत होते, तेव्हाही नितीश कुमार त्यांच्या घरातून बाहेर निघाले नाहीत. एवढच नाहीतर छपरामध्ये दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरही त्यांनी शोक व्यक्त केला नाही.” अशी टीकाही प्रशांत किशोर यांनी केली.
याचबरोबर, “बिहारमध्ये जागोजागी दारू घरपोच मिळत आहे आणि बिहार सारख्या गरीब राज्याचे संपूर्ण वर्षभरात दारू बंदीमुळे जवळपास २० हजार कोटींचे नुकसान होत आहे. बिहारमधील दारू बंदी पूर्णपणे अयशस्वी आहे. दारूबंदीमुळे जे नुकसान होत आहे त्याची भरपाई सामान्य जनता आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. डिझेलवर ९ आणि पेट्रोलवर १३ रुपये लिटर टॅक्स वसूल केला जात आहे.”
दारु प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेत बोलताना नितीश कुमार यांनी मदत दिली जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. “दारु प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. आम्ही नेहमीच मद्यप्राशन करु नका, मृत्यू होईल असं आवाहन करत आहोत. मद्यप्राशनाच्या बाजूने बोलणारे तुमचं काही भलं करु शकत नाहीत,” असं नितीश कुमार म्हणाले आहेत.