पुणे-सोलापूर महामार्गावर गोळीबाराचा थरार, आधी पाठलाग, नंतर फायरिंग

3 कोटी 60 लाखांची रोकड लुटली

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक पाटी (ता. इंदापूर) येथे चारचाकी गाडी अडवून गोळीबार करत 3 कोटी 60 लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी (26 ऑगस्ट) पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने प्रवासी, नागरिकांसह पोलीस खातेदेखील हादरून गेले आहे. ही रक्कम हवाला व्यवहारातील असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणी 40 वर्षीय व्यापारी भावेशकुमार अमृत पटेल यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. भावेशकुमार हे मुळचे गुजरातच्या मेहसाना जिल्ह्याचे आहेत. ते सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांनी इंदापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (26 ऑगस्ट) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास वरकुटे पाटी गावचे हद्दीत पुणे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गांवर रोडवर गतीरोधक आल्यावर त्यांनी चारचाकी स्काॕर्पिओ गाडी (टीएस 09 ईएम 5417) हळू केली. यावेळी अज्ञात चार अनोळखी चोरटे यांनी पायी चालत येवुन हातात लोखंडी टॉमी दाखवून पटेल यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.

भावेशकुमार पटेल यांनी गाडी तेथून भरधाव वेगात सोलापुरकडून पुण्याकडे घेतली. यावेळी मारूती स्विप्ट गाडी आणि टाटा कंपनीच्या गाडीतून त्यांचा अज्ञातांनी पाठलाग केला. भावेशकुमार पटेल यांनी तरीदेखील गाडी थांबवली नाही. त्यामुळे या दोन चारचाकी असलेल्या लुटारांनी पटेल यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्यांनतर या लुटारुंनी त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून गाडीतील भावेशकुमार व विजयभाई यांना चौघांनी हाताने मारहाण केली आणि गाडीमधील रोख रक्कम 3 कोटी 60 लाख रूपये रोख रक्कम आणि 14 हजारांचे दोन तसेच 12 हजाराचा एक मोबाईल असे एकूण 3 कोटी 60 लाख 26 हजार रुपये किंमतीचा माल लुटला.

दरम्यान, घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सुरेशकुमार धस, गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक शेळके, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट देवून गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याच्या तपाससाठी पाच पोलीस पथके तयार केली असून तपास कामी रवाना करण्यात आल्याची माहिती इंदापूरचे प्रभारी पोलीस निरिक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.