आज दि.२१ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या
धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. एटीएसने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहतात. धर्मांतर रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असून, मूकबधिर मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून १ हजारांपेक्षा जास्त लोकांचं त्यांनी धर्मांतर केलं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

दिल्लीत विरोधकांची उद्या
सर्वात मोठी बैठक होणार

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीत आज पुन्हा भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला आता उधान आले आहे. पण, ही भेट उद्या नवी दिल्लीत विरोधकांची सर्वात मोठी बैठक होणार असल्याचे समोर आले आहे. यात १५ पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या बैठीकचे केंद्रबिंदू हे शरद पवार यांचे निवासस्थान असल्यामुळे पुन्हा देशाचे लक्ष पवारांच्या राजकीय डावपेचाकडे लागले आहे.

हे योग दिन वगैरे मला नौटंकी
वाटते : माजी न्यायमूर्ती

५० टक्के बालक कुपोषित आहेत, ५० टक्के महिला अॕनिमिक आहेत, बेरोजगारीने विक्रम मोडलेत, अशात हे योग दिन वगैरे मला नौटंकी वाटते”, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केलं. जनसत्तासाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी योग दिन आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नागपुरात एकाच कुटुंबातील
पाच जणांची हत्या

नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि मेहुणीची हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. नागपुरच्या पाचपावली भागात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दरम्यान घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

आम्हाला 36 जिल्ह्यात आंदोलन
करण्याची इच्छा नाही

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हातात असलेल्या गोष्टी मार्गी लावल्या पाहिजेत. आम्हाला 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही. आजचं मूक आंदोलन संपल्यानंतर राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे. त्यात आज संध्याकाळी पुढची दिशा ठरवली जाणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजी छत्रपती यांनी आज केली. खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

कोरबा जिल्ह्यात ८०० किलो शेण चोरीस

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात शेण चोरी होण्याची विचित्र घटना घडली आहे. छत्तीसगड पोलिसांना कोरबामधील एका गावातून ८०० किलो शेण चोरून नेल्याची तक्रार मिळाली. कोरबा जिल्ह्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरांचा शोध सुरू केला आहे. दिपका पोलीस स्टेशन परिसरातील धुरेना गावात ८ ते ९ जून रोजी मध्यरात्री ८०० किलो शेण चोरीला गेले. त्याची किंमत सुमारे १६०० रुपये आहे. गोधन ग्रामिण समितीचे अध्यक्ष कमहनसिंग कंवर यांनी १५ जून रोजी ही औपचारिक तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस स्टेशन परिसर प्रभारी हरीश तांडेकर यांनी दिली.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे
शहराध्यक्ष जगताप यांना अटक

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी झालेल्या गर्दीमुळे पोलीसांनी पुणे शहराध्यक्षांसह पदाधिका-यांवर रविवारी गुन्हे दाखल केल्यानंतर सोमवारी या प्रकरणात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक केली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन झाले होते. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.

खासदार रामदास आठवले यांनी योग दिनानिमित्त एक कविता केली आहे. ही कविता अशी,

“नेहमी करा योग,
तुमच्याजवळ येणार नाही रोग !
नेहमी करा योग,
निघून जाईल तुमचा रोग ! “

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे ?

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अनाथ मुलांसाठी ‘आशीर्वाद’
योजना नव्याने लागू

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेत मृतांचे प्रमाण अधिक आहे. या लाटेत काही बालकांचे आई-वडील मारण पावले. तर काही कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. याच कारणामुळे कोरोना महामारीमुळे ज्या बालकांचे पालक मरण पावले आहेत, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. ओडिशा सरकारनेसुद्धा अनाथ मुलांसाठी ‘आशीर्वाद’ योजना नव्याने लागू केली आहे.

देशात 1 लाख फ्रंटलाइन
वर्कर तयार होणार

कोरोना साथीरोगाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय. यानुसार देशभरात 1 लाख फ्रंटलाईन वर्कर तयार केले जाणार आहेत. त्यांना सरकार प्रशिक्षणासोबत पैसेही देणार आहे. यासाठी ‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्राम’ लाँच करण्यात आलाय. यात 6 क्रॅश कोर्सचा समावेश आहे. त्यामध्ये कमीत कमी वेळेत तरुणांना कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित केलं जाईल.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.