आम्हाला 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही : खासदार संभाजी छत्रपती

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हातात असलेल्या गोष्टी मार्गी लावल्या पाहिजेत. आम्हाला 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही. आजचं मूक आंदोलन संपल्यानंतर राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे. त्यात आज संध्याकाळी पुढची दिशा ठरवली जाणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजी छत्रपती यांनी आज केली.

खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला नाशिकमधील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर संभाजी छत्रपती यांनी ही घोषणा केली. आरक्षणसााठी ज्या समाजाने 58 मोर्चे काढले. तो समाज आज बाजूला फेकला गेला आहे. जातीय विषमताही वाढत आहे. त्यामुळे आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे. समाजाने दु:ख मांडलं. त्यामुळे पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवायचे का? असा सवाल करतानाच आक्रोश करायला, मोर्चे काढायला दोन मिनिटं लागतात. पण तसं न करता आजवर आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधींनी बोलावं म्हणून हे आंदोलन केलं जात आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

लोकप्रतिनिधींनी आपआपली जबाबदारी घ्यावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. बहुजन समाज कसा एकत्र होईल यासाठी माझा प्रयत्न आहे. आरक्षणाचे काय पर्याय उपलब्ध आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे, असं सांगातनाच पुनर्विचार याचिका आणि आयोग स्थापन करणं हे पर्याय आहेत, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. त्यांनीही मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका मांडली. मराठा समाजाच्या आरक्षणासह ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही अतिशय महत्वाची असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकारात्मक आहे. ज्या ज्या वेळेस विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित झाले त्या त्या वेळेस आम्ही पाठिंबाच दिला आहे. आज आरक्षणाचा प्रश्न हा दोन समाजातील नसून हा व्यवस्थेविरुद्ध लढा आहे आणि त्याला माझा नेहमीच पाठिंबा असेल, असे भुजबळांनी स्पष्ट केलं. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्रित करण्याची जी भूमिका घेतली आहे ती स्वागतार्ह आहे. सर्वांना एकत्रित करताना संभाजीराजे हे अतिशय सामंजस्याची भूमिका घेत असल्याने त्यांचे कौतुक देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.