तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भारत २०४७ पर्यंत विकसित देश होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. डिजिटल क्रांतीचे लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावेत यासाठी व्यापक प्रमाणात आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असल्याचे ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर करून आयुष्य सोपे कसे करावे या विषयावर एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या १० समस्या ओळखाव्यात असे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थितांना केले.
लहान व्यवसायांना अनेक नियमांचे पालन करावे लागतात, त्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात करण्यासाठी अनावश्यक नियमाची यादी करावी असे आवाहन पंतप्रधानांनी उद्योग जगताला केले. व्यावसायिकांप्रमाणेच करदात्यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी करप्रणाली सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा दावा मोदींनी या वेळी केला.