प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्ला हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्युषा तिच्या तेलंगणा येथील राहत्या घरात पोलिसांना मृतावस्थेत आढळली आहे. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार प्रत्युषाचा तेलंगणातील बंजारा हिल्स येथील तिच्या घरात मृतदेह सापडला आहे. पोलिसांना तिच्या बेडरुमध्ये कार्बन मोनॉक्साईड सिलेंडरही सापडला आहे. तो सिलेंडर पोलिसांनी जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषा घरात असताना तिच्या घराबाहेरील सुरक्षा रक्षकांनी कामानिमित्त दरवाज्याची अनेकदा बेल वाजवली. पण तिने दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बराचवेळ आवाज दिल्यानंतरही आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या घराचा मुख्य दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. पोलिसांनी घरात तपास केला असता तिथे प्रत्युषाचा मृतदेह आढळला. त्यामुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली.