मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 43 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे. या मंत्रिमंडळात नव्या-जुन्या आमदारांचा समावेश करतानाच एम फॅक्टरलाही विशेष स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार मंत्रिमंडळात 7 मुस्लिम आणि 8 महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता सरकारमधील 43 मंत्र्यांना आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात आलं. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट मंत्री आणि 19 स्वतंत्र प्रभार आणि राज्य मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात 19 मंत्र्यांपैकी 10 मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. तर 9 मंत्र्यांकडे राज्य मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
तिसऱ्यांदा बंगालची सत्ता हातात आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांना घेत बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच निवडणुकीतील एम फॅक्टरलाही मंत्रिमंडळात विशेष स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार 7 मुस्लिम आणि 8 महिलांचा मंत्रिमंडळात समावेश करून राजकीय संदेश देण्याचं कामही त्यांनी दिलं आहे.
माजी अर्थ मंत्री अमित मित्रा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. आजारामुळे त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. तरीही त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ममतादीदीसह अमित मित्रा यांनाही सहा महिन्याच्या आत विधानसभा निवडणुकीत विजयी व्हावं लागणार आहे. नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. तसेच माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी आणि माजी आयपीएस अधिकारी हुमायूं कबीर यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी
मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात सुब्रत मुखर्जी, पार्थ चटर्जी, अमित मित्रा, अरुप विश्वास, उज्जवल विश्वास, अरुप राय, चंद्रनाथ सिन्हा, ब्रात्य बसू, शशि पांजा, जावेद खान, स्वपन देवनाथ, फिरहाद हकीम, शोभनदेव चट्टोपाध्याय, साधन पांडेय, ज्योति प्रिय मल्लिक, बंकिम चंद्र हाजरा, सोमेन महापात्रा, मलय घटक, सिद्दिकुल्ला चौधरी आदींचा समावेश आहे.
दीदींनी आपल्या मंत्रिमंडळात आठ महिलांचा समावेश केला आहे. मानस रंजन भुइयां, रथीन घोष, पुलक राय, बिप्लव मित्रा आदींचा या मंत्रिमंडळात समावेश आहे.
फिरहाद हाकिम, जावेद अहमद खान, गुलाम रब्बानी, सिद्दीकुल्लाह चौधरी, हुमायूं कबीर, जबकिअख्रुजमान आणि यास्मीन सबीना आदी मुस्लिम चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे