श्रीरामपूरच्या लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातल्या 6 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींचं बळजबरीने धर्मांतर करण्यात आलं होतं. न्यूज 18 लोकमतने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. धर्मांतर प्रकरणातला मुख्य आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटरसह सहा जणांवर मकोका लावण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहर आणि परिसरातल्या अनेक मुली काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. यामागचं सत्य समोर आल्यावर राज्यभरात खळबळ उडाली. मुलींचं अपहरण करून त्यांचं धर्मांतर केलं जात होतं. मशिदीत मुलींचा निकाह लावून त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं जात होतं. न्यूज18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर इम्रान कुरेशी उर्फ मुन्ना कटर, प्रशांत गोरे, सुमन पगारे, सचिन पगारे, बाबासाहेब चेंडवाल, मिनाबाई मुसावत या सहा आरोपींवर मकोका लावण्यात आला.
श्रीरामपूरमधला लव्ह जिहादचा मुद्दा आमदार नितेश राणेंनी विधानसभेत उपस्थित केला होता. आतापर्यंत सुमारे 10 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
एकट्या श्रीरामपूर परिसरातल्या 100 तरुणी लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्याचा आरोप केला जात आहे. श्रीरामपूरमधील मुल्ला कटर आणि 25 जणांची टोळी लव्ह जिहादसाठी सावज टिपत असल्याचं स्पष्ट झालंय. मुल्ला कटरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुल्लाने अनेक मुलींचा अमानुष छळ करून वाम मार्गाला लावल्याचा आरोप केला जातोय. 13 वर्षांच्या मुलीचा मशिदीत निकाह लावणाऱ्या मौलानावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.