ठाकरेंच्या मशालीला विरोध करणाऱ्या समता पक्षाचा धगधगता इतिहास

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मशाल या चिन्हाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. पण हे चिन्ह वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कारण समता पक्षाने या चिन्हावर आक्षेप घेतला आहे. समता पक्षाचं देखील मशाल हे चिन्ह आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह आणि आमच्या पक्षाचं चिन्ह सारखीच दिसत आहेत. मतदान यंत्रावर चिन्हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट दिसतात. त्यामुळे आमची चिन्हं सारखीच दिसतील”, असं समता पक्षाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी समता पक्षाने दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणावर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी आहे. पण या सगळ्या घडामोडींदरम्यान समता पक्ष चर्चेत आला आहे. हा समता पक्ष नेमका कुणाचा आहे जो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हाला विरोध करत आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असेल. आम्ही याच समता पक्षाची माहिती आज तुम्हाला देणार आहोत.

लढणं हे आपल्या रक्तात असतं. हे लढणं सगळ्यांनाच जमत नाही. अन्यायाविरोधात पेटून उठत लढण्याचं धाडस फार मोजक्या लोकांमध्ये असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. मग तो व्यक्ती असूदे, पक्ष असूदे किंवा एखादी सामाजिक संघटना. लढण्याशिवाय पर्याय नाही. जी परिस्थिती आहे तिला सामोरं जावून, संघर्ष करुन आपला ठसा उमटवणं, लोकांच्या मनात स्थान निर्माण करणं हा एक संघर्षच आहे. या संघर्षात अनेक संकटांना तोंड देत लढणं आणि त्यावर मात मिळवणं हे कौशल्यच आहे. भारतात अशा लढवय्या दिग्गजांची कमी नाही. एखाद्या क्षेत्रात शून्यापासून सुरुवात करत, संघर्ष करत मोठं नावारुपाला आलेले अनेक दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात तर असे अनेक उदाहरणं आहेत. या नेत्यांमध्ये दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचं नाव आदराने घेतलं जातं. शिवसेनेच्या मशाल चिन्हाविरोधात दिल्ली हायकोर्टात गेलेला समता पक्ष हा जॉर्ज फर्नांडिस यांचाच. जॉर्ज यांनीच या पक्षाला जन्म दिला. जॉर्ज यांनी पक्षाला प्रचंड मोठं देखील केलं. पण सध्या या पक्षाचे हवे तितके लोकप्रतिनिधी नाहीत. पण तरीही पक्ष मजबूत आहे. हे या पक्षाने आज घेतलेल्या भूमिकेतून दिसून येत आहे. शिवसेना सारख्या मोठ्या पक्षाच्या चिन्हावर आक्षेप घेत हायकोर्टात जाणं सोपी गोष्ट नाही. जॉर्ज यांची संघर्ष करण्याची नीती आजही पक्षातील सध्याच्या कार्यकर्त्यांमध्ये जीवंत आहे हे यातून दिसून येतंय.

जॉर्ज फर्नांडिस आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आणि जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी मिळून 1994 मध्ये समता पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाच्या तिकीटावर नितीश कुमार 2000 मध्ये पहिल्यांदा अवघ्या आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी 2008 साली जनता दल (संयुक्त)ची स्थापना केली. यावेळी त्यांनी समता दलाचं विलीनीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रह्मानंद मंडल यांनी त्यांना विरोध केला. विशेष म्हणजे जॉर्ज फर्नांडिस हे नितीश कुमार यांच्या बाजूने होते. ते जनता दलाच्या तिकीटावर नंतर निवडूनही आली. दरम्यान, समता पक्षाची त्यावेळची लढाई निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली. त्यावेळी निवडणूक आयोगाने समता पक्ष चालवण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर ब्रह्मानंद मंडल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. समता पक्षाने बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत उदय मंडल यांच्या नेतृत्वात 10 जागा लढवल्या. पण त्यांना एकाही जागेवर विजय मिळाला नाही. त्यानंतर 2021 मध्ये समता पक्षामध्ये संघटनात्मक निवडणूक झाली. यामध्ये ब्रह्मानंद मंडल यांची पुन्हा पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली. तर उदय मंडल यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली. ब्रह्मानंद मंडल हे बिहारच्या मुंगेर शहराचे माजी खासदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.