देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसतेय. अशातच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात आलाय. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून अनेकांनी लसी घेतल्या आहेत. मात्र आता लसीच्या कमतरतेमुळे ही मोहीम मंदावत असल्याचं चित्र समोर आहे. यामुळे पहिला डोस घेतलेल्यांना दुस-या डोससाठी प्रतीक्षा करावी लागतेय.
कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या लसमात्रेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं सगळीकडेच चित्र आहे. जवळपास 4 कोटी नागरिकांना कालमर्यादेत लस मिळत नसल्याची सरकारने कबुली दिलीये. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. देशातील 3.86 कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस निर्धारित वेळेत मिळाला नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते रमण शर्मा यांनी याबाबत अर्ज केला होता. कोविशील्ड तसंच कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या किती लोकांना दुसरा डोस निर्धारित वेळेत मिळाला आहे की नाही, याची आकडेवारी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागितली होती. त्यांच्या या मागणीवर आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना लस प्रशासन पथकाने उत्तर दिलंय.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्टपर्यंत 3,40,72,993 लोकांना कोविशील्ड लसीचा दुसरा डोस निर्धारित वेळेत मिळाला नाही. तर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना 46,78,406 लोकांना दिलेल्या वेळेत दुसरा डोस मिळाला नाही.
तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पुण्याचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, कोविड -19 लसीचा तिसरा डोस 6 महिन्यांनी घ्यावा. लसीच्या 2 डोसांमधील अंतर 2 महिने असावं. द लॅन्सेट मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असं म्हटलंय की, काही काळानंतर कोविड विरुद्ध कोविडशिल्डच्या अँटीबॉडीज कमी होतात.