आज दि.१९ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

न्यायालयीन चौकशी पूर्ण
झाल्याशिवाय चौकशीला जाणार नाही

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने ५ वेळा समन्स बजावले आहेत. त्यांना ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

देशमुख यांच्या वाटमारीत मुख्यमंत्री
आणि पवारांची कितपत भागीदारी

अनिल देशमुख यांच्या वाटमारीत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची कितपत भागीदारी होती याचीही चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

मराठी माणसाच्या जीवनात शिवसेना
परिवर्तन करु शकली नाही : राणे

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली, मग मराठी माणसाच्या जीवनात हे परिवर्तन का करू शकले नाहीत ? मातोश्रीचं परिवर्तन झालं, एकाचे दोन बंगले झाले, पण मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल नाही. अनेक शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. ही पाळी का आणावी?”, असा सवाल नारायण राणे यांनी परळमध्ये बोलताना विचारला आहे.

रविंद्रनाथ टागोर यांचा वर्ण सावळा
असल्याने आई त्यांना जवळ घेत नव्हती

रविंद्रनाथ टागोर यांचा वर्ण सावळा असल्याने त्यांची आई लहानपणी त्यांना जवळ घेत नव्हती, असं वादग्रस्त मंत्री सुभाष सरकार यांनी केलं आहे. या विधानानंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसनं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. रविंद्रनाथ टागोर यांचा अपमान असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. वर्णभेदाविरुद्ध वक्तव्य असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी सारवासारव केली आहे.

हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याचा
देश सोडण्यास नकार

थरकाप उडवणारे अफगाणिस्तानमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तिथल्या सरकारी इमारती, शासकीय निवासस्थाने आणि सार्वजनिक आयुष्यात देखील तालिबान्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसत आहे. अनेक अफगाणी नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काबूल येथील हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याने देश सोडण्यास नकार दिला आहे.

भारतासोबत सर्व प्रकारची आयात
निर्यात तालिबानने रोखली

रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केल्यानंतर तालिबानने भारतासोबत सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. देशातून होणारी आयातही रोखण्यात आली आहे.

अफगाणमध्ये 1600
भारतीय अडकलेले

अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललीय. तालिबान्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळचा तालिबान बदलल्याचा दावा केला. तसेच शरिया कायद्यानुसार महिलांना स्वातंत्र्य देऊ असं म्हटलं. मात्र, या तालिबानचा खरा शोषणकारी चेहरा वारंवार समोर येत आहे. अनेक व्हिडीओंमध्ये तालिबानचा सामान्य नागरिकांवरील अत्याचार उघड होतोय. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानमधील भारतीयांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र, अद्यापही 1600 भारतीय तालिबानचं नियंत्रण असलेल्या अफगाणमध्ये अडकलेले आहेत.

29 ऑगस्टला नाशिकच्या
शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च

कृषी कायदे रद्द करण्यासाठी नवी दिल्लीत शेतकऱ्यांनी गेल्या नऊ महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता नाशिकच्या शेतकऱ्यांनी दंड थोपाटले आहेत. नाशिक जिल्हा शेतकरी समन्वय समितीने येत्या 29 ऑगस्ट रोजी जिल्हाव्यापी ट्रॅक्टर मार्चची हाक दिली आहे. थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच हा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

संशयित शिक्षणाधिकारी
वैशाली वीर-झनकर कारागृहात

आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांची अखेर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. छातीत दुखत असल्याचं कारण सांगून त्या रुग्णालयात अॕडमिट झाल्या होत्या, मात्र रात्री त्यांची रवानगी कारागृहात झाली. शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर पकडल्या गेल्या आहेत. झनकर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.