मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे प्रचंड आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा द्यावाच, परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. मेटे यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विनायक मेटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. मराठा समाज न्यायालयाच्या दृष्टीने मागास नाही, हे सुद्धा राज्य सरकारचे पाप आहे. आरक्षण रद्द करण्यात आल्याने आता नवीन कायदा होऊ शकत नाही. या सर्वांना आघाडी सरकार जबाबदार आहे. अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आणि घोडचुकीमुळे मराठा समाजाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी देखील मराठा आरक्षण गांभीर्याने घेतले नाही. त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मेटे यांनी केली.
मुख्यमंत्री म्हणतात आम्ही केंद्राच्या पाया पडतो. पण त्यांनी आरक्षण द्यावं. केंद्राच्या पाया पडण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राला द्यावा आणि पुढची कारवाई करावी, असा टोला मेटे यांनी लगावला.
नाचता येईना अंगण वाकडे अशी भूमिका सरकारने घेऊ नये. अन्यथा लॉकडाऊन झाल्यावर आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. लॉकडाऊन झाल्यावर आम्ही बीडमध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात मोर्चा काढणार आहोत. राज्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही. सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.