जागतिक ख्यातीच्या वेरुळ लेणीचं सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण लेणी फिरण्यासाठी बराच मोठा फेरा मारावा लागतो. हे अंतर जवळपास 2.2 किलोमीटरचे आहे. बऱ्याच वेळा याच कारणास्तव काही पर्यटक लेणीत येण्याचं टाळतात किंवा प्रमुख काही लेण्यांचा अनुभव घेऊन परत फिरतात. मात्र पर्यटकांची ही अडचण समजून घेत भारतीय पुरातत्त्व खात्याने लेणी परिसरात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एसी आणि नॉन एसी 20 वाहने घेतली जातील. त्यासाठी 30 ते 40 रुपयांचे तिकीट लागेल. या वाहन खरेदीसाठीचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
वेरुळमधील शिल्पांचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर प्रत्येक लेणीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मात्र एकूण 34 लेणींचं हे अंतर जवळपास 2.2 किलोमीटरचं आहे. याठिकाणी एसटी महामंडळाची बस धावते, मात्र अजिंठा लेणीप्रमाणे वेरुळ लेण्यांमधली बस प्रदुषणमुक्त नसल्याने लेणीला धोका निर्माण होतो. यावर पर्याय म्हणून पुरातत्व खाते आता वेरुळमध्येही बॅटरीवर चालणारी पर्यावरणपूरक वाहने खरेदी करणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली.
वेरुळ लेण्यांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना एका लेणीपासून दुसऱ्या लेणीपर्यंत ने-आण करण्याचे काम बॅटरीवर चालणारी 20 वाहने करतील. यात 5 एसी आणि 15 नॉन एसी वाहने असतील. एसी वाहनात 7, तर साध्या वाहनांत 15 आसन क्षमता असेल. लेणीच्या तिकिटाशिवाय वाहनासाठी वेगळे तिकीट घ्यावे लागेल. ते ऐच्छिक असेल. पर्यटकांना पायी लेणी बघण्याचा पर्यायही खुला राहील. वाहनासाठी 30 ते 40 रुपयांदरम्यान तिकीट लागेल. एकदा चिकिट काढल्यावर ते दिवसभर चालेल. एका वाहनातून एका लेणीत गेल्यावर पुढील लेणीसाठी दुसऱ्या वाहनात बसता येईल.
ही सेवा 1 जानेवारीपासूनच सुरु करण्याचा पुरातत्त्व खात्याचा विचार होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नाही झाले. आता पुढील महिन्यात लेणी परिसरात ही बॅटरीवरील वाहने धावतील. लेणी मार्गावर 5 ठिकाणी बस स्टॉप उभारले जातील. लेणी परिसराच्या बाहेर ही वाहने उभी करण्यासाठी खास डेपोसारखी जागा दिली जाईल. येथेच त्यांचे चार्जिंग स्टेशन असेल. खासगी कंत्राटदारांमार्फत ही वाहने चालवली जातील.