नीरव मोदी, मल्ल्या, चौक्सी यांची ९ हजार कोटींची संपत्ती केली सरकारकडे हस्तांतरित
बँकांना गंडा घालून फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठा झटका दिला आहे. तिन्ही उद्योगपतींनी सार्वजनिक बँकांचं कर्ज बूडवून परदेशात पोबारा केला आहे. ईडीने नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चौक्सी यांची १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी ९ हजार कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे. ईडीने विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची १८ हजार १७० कोटींची संपत्ती संपत्ती जप्त केली होती. ईडीने ट्वीट करून या प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे.
मूकबधिर मुलांना करणार होते
मानवीबॉम्ब,एटीएसमुळे कट उघड
जगाला हादरवून सोडणाऱ्या भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश करीत उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. धर्मांतरणाच्या खेळांतर्गत मुकबधीर विद्यार्थ्यांचा मानवी बॉम्ब म्हणून वापर होणार होता. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाला हादरे बसण्याची शक्यता होती. नोएडा सेक्टर ११७ येथील डेफ सोसायटीमध्ये शिकणाऱ्या मूक-बधीर विद्यार्थ्यांचा यात वापर केला जात होता. मूकबधीर मुलांचे धर्मांतरण करून त्यांचा वापर करणे सोपे आहे, याची आरोपींना खात्री पटली.
विश्वासार्ह बातम्यांच्या बाबतीत
भारतीय माध्यमे वरचढ
विश्वासार्ह बातम्यांच्या बाबतीत भारतीय माध्यमांनी ३१ वा क्रमांक पटकावल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. एकूण ४६ नमुन्यांचा अभ्यास केल्यावर ही माहिती समोर आली आहे. रॉयटर्स इन्स्टिट्युटने हे सर्वेक्षण केलं आहे. रॉयटर्स इन्स्टिट्युट फॉर स्टडी ऑफ जर्नालिझमच्या या वर्षीच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सर्वेक्षणातून काढलेले निष्कर्ष अहवालामधून जाहीर करण्यात आले आहेत. करोनाच्या काळात करण्यात आलेलं हे सर्वेक्षण बातम्यांच्या विश्वासार्हतेबद्दलचं होतं. प्रथमच या अहवालामध्ये भारताची वर्णी लागली आहे.
निवडणुका रद्द केल्या नाहीत तर
भाजपा उग्र आंदोलन करणार
राज्य निवडणूक आयोगाने नागपूरसह पाच जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षण राहणार नाही. त्यामुळे आता यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुका रद्द केल्या नाहीत तर भाजपा उग्र आंदोलन करणार असल्याचा राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे.
शरद पवारांनी उद्घाटन केले,
मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती
राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने एकीकडे स्वबळाची भाषा सुरू केलेली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्यांचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तपासणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा न करताच परस्पर स्थगिती दिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या हस्तेच टाटा कॅन्सरच्या या रुग्णालयाला सदनिकांच्या चाव्या सुपूर्द केल्या होत्या.
निवृत्तिनाथांची पालखी
२४ जूनला प्रस्थान करणार
त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथांची पालखी वट पौर्णीमेस पंढरपुरकडे प्रस्थान करते. आता २४ जून रोजी अर्थात वटपौर्णिमेला पालखी प्रस्थान सोहळा मंदिरात मोजक्या भाविकंच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तर आषाढी एकादशीचे एक दिवस आधी दोन शिवशाही बसद्वारे पालखी पंढरपुरला जाईल अशी माहिती प्रशासकीय समितीच्या वतीने देण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे
सरकार करणार ऑडिट
ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या मोठ्या अनुदानांवर आता सरकारची करडी नजर असणार आहे. या अनुदानाचा वापर गावातील विकासकामांवर व्यवस्थित होत आहे का, याचे नियमित सोशल ऑडिट होणार आहे. एवढेच नव्हे तर अनुदान खर्च करण्याच्या पद्धतीचेही ऑनलाईन ऑडिट होईल. देशातील शंभर टक्के ग्रामपंचायतींसाठी केंद्र सरकारने ही प्रणाली लागू केली आहे. गावांमधील सर्वच कामे ग्राम पंचायत विकास योजनेच्या अंतर्गत केली जाऊ शकणार आहे.
पाकिस्तानची उदारता
दहशतवाद्यांना पेन्शन
खतरनाक आणि आंतरराष्ट्रीय काळ्या यादीतील दहशतवाद्यांना निवृत्तीवेतन व निवारा उपलब्ध करून दिल्याबद्दल पाकिस्तानची निंदा करत भारताने म्हटले आहे की, दहशतवादाला मदत करण्यासाठी इस्लामाबाद सरकारला थेट जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. याबाबत मानवाधिकार परिषदेच्या ४७ व्या अधिवेशनात पाकिस्तानवर टीका करताना भारतीय प्रतिनिधी पवनकुमार बधे म्हणाले की, जगातील दहशतवादाचा धोका हा मानवाधिकारांमधील गंभीर आहे आणि सर्व प्रकारांवर कठोरपणे कारवाई केली जावी.
प्राप्तिकर विभागाच्या नव्या
पोर्टलवर अनेक अडचणी
प्राप्तिकर विभागाने सुरु केलेल्या नव्या कर पोर्टलवर येत असलेल्या समस्यांबाबत आज केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि इन्फोसिसचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते. प्राप्तिकर विभागाने सात जून रोजी नव्या ई-फायलिंग पोर्टल 2.0 चा शुभारंभ केला. पोर्टलच्या कामात अनेक अडचणी येत आहे.
देशात लसीकरणाचे प्रमाण
कमीच : राहुल गांधी
देशातल्या लसीकरण मोहिमेबद्दल भाष्य करत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण व्हायला हवं पण ते होत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. ट्विटर अकाऊंटवरुन ते बऱ्याचदा टीका करत असतात.
राज्यात डेल्टा प्लस
विषाणूचे 21 रुग्ण
कोरोनाच्या संकटानंतर संकटावर संकट राज्यावर येत आहे. ‘डेल्टा’नंतर आलेल्या ‘डेल्टा वन’ व्हायरसने आणखी चिंता वाढवली असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. ‘डेल्टा वन’चा संसर्ग वेगाने होतोय आणि ‘लस’बाबतही ती कितपत प्रभावी आहे, याचा जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबत डॉ. अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली.
अमेरिकेनं महाकाय
बॉम्ब समुद्रात फोडला
अमेरिकेनं केलेल्या एका जबरदस्त स्फोटाची सध्या चर्चा आहे. अमेरिकेनं तब्बल अठरा हजार किलोचा बॉम्ब फोडला. चीन समुद्रातली सामरिक ताकद वाढवतंय. त्या ताकदीला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने अटलांटिक महासागरात महाकाय स्फोट घडवून आणला. चीनच्या वाढत्या समुद्री सामर्थ्याचा सामना करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
14 स्पेशल ट्रेन सुरू
करण्यात येणार
रेल्वेप्रवाशांची सोय व्हावी म्हणून भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्यात.पूर्व मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्टेशनवर थांबणाऱ्या 7 जोडी म्हणजेच 14 स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. 24 जूनपासून पुढील आदेशापर्यंत या सर्व गाड्या सुरु ठेवल्या जाणार आहेत. या गाड्या बिहार-झारखंडमधील पटणा, मुजफ्फरपुर, राजगीर, गया, रांची, धनबाद आदींचा यात समावेश आहे.
पाच जिल्हा परिषदेच्या
निवडणुका जाहीर
निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
चाचपणी नंतर राज्यात दहावी
बारावीचे वर्ग सुरू होणार
राज्यात कोरोनामुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पहावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. जी गावे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10 आणि 12 वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहाण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पुणे महापालिकेचे बालगंधर्व पुरस्कार जाहीर
पुणे महापालिकेचे बालगंधर्व पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. सन २०२० चा बालगंधर्व मुख्य पुरस्कार नाट्य आणि संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री श्रीमती निर्मलाताई गोगटे यांना जाहीर झाला आहे. तर मुख्य पुरस्काराबरोबरच चित्रपट व नाटय क्षेत्रातील लेखन व दिग्दर्शनासाठी श्री. किरण यज्ञोपवित नाटय व्यवस्थापनासाठी प्रवीण बर्वे,रंगमंच व्यवस्थापनासाठी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून श्री. संदीप देशमुख, संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी ज्येष्ठ कलाकार श्री. रविंद्र कुलकर्णी आणि बालगंधर्वांचा ठेवा जतन करुन, विविध नाटयसंम्मेलनात प्रदर्शन भरवून, त्यांची आठवण नवीन पिढीला करुन देण्यासाठी ‘सौ. अनुराधा राजहंस यांचाही सन्मान होणार आहे.
न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी ; WTC फायनलला गालबोट
भारत आणि न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीला प्रेक्षकांनी गालबोट लावले आहे. लढतीच्या पाचव्या दिवशी मैदानावर लाजिरवाणा प्रकार घडला. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलर याच्यावर दोन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिका केल्याचा आरोप करण्यात आला असून यानंतर त्यांना मैदानातून बाहेर काढण्यात आले. आयसीसीचे जनरल मॅनेर क्लेअर फरलॉन्ग यांनी ट्विट करून या कारवाईबाबत माहिती दिली आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, डॉमिनिक डा सुजा नावाच्या एका ट्विटर युजरने आयसीसीच्या जनरल मॅनेजरला टॅग करत न्यूझीलंडच्या खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आल्याची तक्रार केली.
SD social media
9850 60 3590