केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचताना टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रॉस व केन या जोडीनं नाबाद ९६ धावा जोडल्या अन् जेतेपद नावावर केले. रॉस टेलरनं मोहम्मद शमीला स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकार खेचला अन् जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
टेलरच्या या विजयी चौकारानंतर किवींच्या ड्रेसिंगरुममध्ये भावनांचा बांध फुटलेला पाहायला मिळाला.
भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, परंतु रिषभ पंत व रोहित शर्मा वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले अन् भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. केन व रॉस अनुक्रमे ५२ व ४७ धावांवर नाबाद राहिले.
संक्षिप्त धावफलक – भारत ( पहिला डाव) – २१७ ( अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४, रोहित शर्मा ३४; कायले जेमिन्सन ५-३१) व ( दुसरा डाव) – १७० ( रिषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टीम साऊदी ४-४८, ट्रेंट बोल्ट ३-३९) पराभूत वि. न्यूझीलंड ( पहिला डाव) – २४९ ( डेव्हॉन कॉनवे ५४, केन विलियम्सन ४९, टीम साऊदी ३०; मोहम्मद शमी ४-७६, इशांत शर्मा ३-४८) व ( दुसरा डाव) – २ बाद १४० ( केन विलियम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७, आर अश्विन २-१७)