पाकिस्तान सरकारने मेळाव्यांवर घातलेली बंदी झुगारून पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराबाहेर जमलेल्या त्यांच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बुधवारी अश्रूधुराच्या फैरी झाडल्या आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला.आपल्या ‘शांततामय’ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-इ-इन्साफ (पीटीआय) पक्षाने केला. लाहोर या प्रांतिक राजधानीत सार्वजनिकरीत्या एकत्र येण्यावर बंदी घालणारे कलम १४४ लागू करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
पक्षाने पोलिसांच्या कारवाईचे वर्णन ‘फॅसिस्ट’ असे केले. इम्रान खान यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांच्या मोठय़ा ताफ्याने खान यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनर आणि अडथळे उभे करून तिकडे जाण्यास प्रवेश बंदी केली होती.
पोलिसांनी पीटीआयच्या कार्यकर्त्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा केला व अश्रूधुराच्या फैरी झाडल्या, तसेच महिलांसह कार्यकर्त्यांवर छडीमार केला. विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडय़ांमध्ये कोंबले, असा आरोप पक्षाने केला. कार्यकर्त्यांनी जवळच पार्क केलेल्या गाडय़ांची दंगल पोलिसांनी मोडतोड केली, तसेच या कृतीचा निषेध करणाऱ्या पत्रकारांना पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली, असा दावाही पक्षाने केला.
फार मोठय़ा संख्येत जमलेल्या पीटीआय कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे गेल्या रविवारी पोलीस इम्रान खान यांना अटक करण्यात अपयशी ठरले होते. खान यांनी तोशाखानातील भेटवस्तू कमी किमतीत खरेदी करून त्या जास्त किमतीला विकल्या, असा त्यांच्यावर आरोप आहे.