क्रिकेटमध्ये दररोज विक्रम होतात आणि मोडले जातात. पण कधी कधी क्रिकेटच्या मैदानावर असे काही घडते, ज्यामुळे खेळाडूंना त्यांच्या चाहत्यांची लाज वाटते. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी बिग बॅश लीगमध्ये पाहायला मिळाला. बिग बॅश लीगमध्ये शुक्रवारी अॕडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी थंडर्सयांच्यात महत्त्वाचा सामना झाला. पहिल्या सामन्यातील रोमहर्षक विजयानंतर सिडनी थंडर्स सलग दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. पण ॲडलेड स्ट्रायकर्सच्या गोलंदाजांनी त्याच्यासोबत मोठा खेळ केला. ॲडलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरला अवघ्या १५ धावांत गुंडाळले.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट हे अतिशय आक्रमक आणि मजबूत क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत संघाची कामगिरी घसरली आहे. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या टी२० लीगमध्ये शुक्रवारी असे काही पाहायला मिळाले, ज्याची किमान ऑस्ट्रेलियन संघाने कल्पनाही केली नसेल. संपूर्ण संघ अवघ्या १५ धावांवर बाद झाला. १४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अॅडलेड स्ट्रायकर्ससमोर सिडनी थंडर्सचा संपूर्ण संघ अवघ्या १५ धावांत गारद झाला.
३५ चेंडू खेळून संपूर्ण संघ सर्वबाद
या सामन्यात सिडनी संघाची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. संपूर्ण संघाला पॉवरप्लेची पूर्ण सहा षटकेही खेळता आली नाहीत. दमदार खेळाडूंनी सजलेला सिडनी थंडर्सचा संघ या सामन्यात ५.५ षटकात अवघ्या १५ धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर सोशल मीडियावर या टीमची खूप चर्चा होत आहे. क्रिकेट चाहते सिडनी संघाला जोरदार ट्रोल करत आहेत. बिग बॅश लीगच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. तत्पूर्वी, मेलबर्न रेनेगेड्सचा संघ ५७ धावांत गारद झाला.
या सामन्यात सिडनी थंडर्ससंघाच्या नावावर अनेक लाजिरवाण्या विक्रमांची नोंद झाली. बिग बॅश लीगच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येसह, पुरुषांच्या टी२० क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या देखील ठरली आहे. पुरुषांच्या टी२० क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत कोणताही संघ २० पेक्षा कमी धावांत ऑलआऊट झालेला नाही. पण आता या रेकॉर्डवर सिडनी थंडर्सचे नाव लिहिले गेले आहे. यापूर्वी हा विक्रम तुर्कीच्या नावावर होता. तुर्कीचा संघ २०१९ मध्ये झेक प्रजासत्ताकविरुद्ध २१ धावांवर गारद झाला होता. यासह, पुरुषांच्या टी२० क्रिकेटमध्ये प्रथमच, एक संघ केवळ ३५ चेंडूत ऑलआऊट झाला आहे.
५ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत
या सामन्यात ॲडलेड स्ट्रायकर्सने प्रथम खेळताना सिडनी थंडर्सला १४० धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना सिडनीचे ५ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. तर उर्वरित ५ फलंदाज ४ धावांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. ॲडलेडकडून हेन्री थॉर्नटनने सर्वाधिक ५ बळी घेतले. तर वेस अगरने ४ बळी घेतले. १४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी थंडर्ससंघ पॉवरप्लेमध्येच १५ धावा करून सर्वबाद झाला.