एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या धक्क्यामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे, त्यातच आता उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषदेमध्ये शिवसेनेच्या विरोधी पक्षनेतेपदाला मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी अधिकृतरित्या नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं होतं. त्यानंतर अजित पवारांना विधानसभेचं तर अंबादास दानवे यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवाकडून याबाबतचं अधिकृत पत्रक काढण्यात आलं आहे.
शिवसेनेला विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद द्यायला काँग्रेसने विरोध केला होता. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे तर विधानपरिषदेचं उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे, त्यामुळे विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळायला पाहिजे होतं, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
संख्याबळ पाहता जवळपास सगळेच समान आहेत, त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देणं आवश्यक आहे. दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही, हा आमचा आक्षेप आहे. आम्ही जर मित्र आहोत तर एकमेकांशी बोललं पाहिजे, अशा शब्दांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली.