भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयांना रेमडेसिव्हीर औषधे, ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. प्राप्तिकर विभागातील सिंघम म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वरिष्ट आयआरएस अधिकारी विक्रम पगारिया यांनी कोरोना संकटात लोकांच्या मदतीकरता पुढाकार घेतला आहे. गुगल ड्राईव्ह मोहिमेद्वारे त्यांनी 15 दिवसांमध्ये 2 कोटी रुपये जमा केले आहेत. याद्वारे त्यांनी 30 शहरातील 42 रुग्णालयांमध्ये 400 उपकरण उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये ऑक्सिजन कंन्सट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर, औषधे आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे. विक्रम पगारिया यांच्या मोहिमेला भारतातील सर्व राज्ये आणि परदेशातून देखील मदत मिळाली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. विक्रम पगारिया यांनी सुरु केलेल्या मोहिमेला त्यांच्या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं देखील सहकार्य मिळालेलं आहे. या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर विक्रम पगारिया यांनी दोन कोटी रुपये जमवले आणि देशभरातील 30 रुग्णालयांना आवश्यक उपकरण दिली आहेत.
हेल्प इंडियन हॉस्पिटल या नावानं विक्रम पगारिया यांनी मोहीम सुरु केली. ऑनलाईन हेल्प ड्राईव्हद्वारे त्यांनी मदत कार्य सुरु केले. विक्रम पगारिया यांना यूनिवर्सल हेल्थ फाऊंडेशन, भूमिका ट्रस्टचं सहकार्य मिळाले. जमलेल्या दोन कोटीद्वारे त्यांनी ऑक्सिजन कंन्सट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर उपकरणं त्यांनी रुग्णालयांना दिली आहेत. या मोहिमेमध्ये देशातील विविध राज्यातील सनदी अधिकारी देखील मदत करत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड यासह इतर राज्यांमध्ये मदत पोहोचवलेली आहे.