राखीव जागांचे उद्दिष्ट हे जातीव्यवस्था नष्ट करणे हे आहे. याकडे आपल्याला व्यापक दृष्टीने बघायला हवे. देशातील संपत्तीचे न्याय वाटप व्हायला हवे ते आजवर होत नाही. आपला वाटा आपल्याला मिळायला हवा. आपण कुणाचं घेत नाही आहोत. आपण आपल्या हक्काचे मिळवायचे आहे. त्यामुळे राखीव जागांची लढाई ही सामूहिकरित्या लढविण्याची आवश्यकता आहे,” असे मत ज्येष्ठ विचारवंत लेखक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. ते नाशिकमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात होत असलेल्या घडामोडी व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित प्रबोधन शिबीरात बोलत होते.
उत्तम कांबळे म्हणाले की, मंडल आयोगाच्या संदर्भात जो विद्रोह निर्माण झाला त्याचे केंद्रबिंदू नाशिकला होते. मंडल आयोगाचा अहवाल ज्यावेळी प्रसिद्ध झाला तो आपण विमानाने मुंबईत आणि नंतर तो नाशिकला मागविण्यात आला. पांडुरंग गायकवाड आणि जी.जी.चव्हाण यांच्या प्रयत्नांतून क्रांती सुरू झाली. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. राखीव जागांकरता झालेल्या लढायांना तत्कालीन ओबीसी देखील होते. कारण त्यांना भडकविण्यामागे काही राजकीय पक्ष होते. आज ते प्रकार पुन्हा होत आहेत. खुद्द ओबीसी आपल्या हक्काप्रती जागरूक नाही.
धर्माच्या नावाने त्यांना भडकविले जाते. स्त्री शिकली की ती व्यवस्थेच्या डोक्यावर बसते,हक्क मागते, शिक्षण घेऊन साक्षर होते. त्यामुळे स्त्रियांनी शिकू नये म्हणून याच प्रस्थापितानी प्रयत्न केले. त्या काळात शाहू महाराजांनी राखीव जागांसाठी कायदा केला. समाजात ज्याला न्याय मिळाला नाही त्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या राखीव जागा या सामाजिक न्यायाच्या प्रतीक आहे. ही एक विकासाची प्रक्रिया आहे. माणूस निर्माण होण्यासाठी सामाजिक न्यायाची जोड त्याला हवी असते. त्यामुळे शाहू महाराजांनी सामाजिक न्याय मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.