पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील तांदळात भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. मोखाडा तालुक्यातील खोडाळा वाकडपाडा येथे ही घटना समोर आली. हा तांदूळ प्लास्टिकचा असून या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप झालाय. त्यामुळे या तांदूळ पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील पालकांकडून करण्यात येत आहे
कोरोनामुळे सध्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांना घरीच वाटप करण्यात येत असून पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील तांदूळात मोठ्या प्रमाणावर भेसळ असल्याच समोर आल आहे . पालघर मधील मोखाडा तालुक्यातील खोडाळा वाकडपाडा येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेला तांदूळ हा पालकांनी पुन्हा शाळेत परत केला आहे. तांदूळ निवडताना आणि गिरणीत टाकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे . हा भेसळयुक्त तांदूळ पाण्यात टाकल्यास काही वेळाने पाण्यावर तरंगू लागतो . भिजलेला तांदूळ हातात घेतल्यास पूर्णपणे विरघळला जात असून आगी वर ठेवल्यास पेट घेत असून त्याला प्लास्टिक सारखा उग्र वास येतोय .पालघर मधील शाळांना पोषण आहारासाठी वाटप केला जाणारा तांदूळ हा जळगाव येथील तांदूळ गिरणीतून येत असून या ठेकेदारावर शासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालक आणि शालेय समिती कडून करण्यात येत आहे .
पोषण आहारात वाटप केला गेलेला तांदूळ हा मोखाडा पंचायत समिती कार्यालयामार्फत देण्यात आला असून पालकांच्या तक्रारीनंतर हा प्रकार वाटप करणाऱ्या शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांच्या लक्षात आला . हा तांदूळ प्लास्टिक सदृश्य असा भेसळयुक्त असल्याची कबुली देखील शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापक यांच्याकडून देण्यात आली आहे . त्यामुळे शालेय समितीने दिलेल्या तक्रारीनुसार या तांदळाचे नमुने तपासणीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आले असून अहवाल सादर झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आल आहे.
(बातमीत वापरलेले छायाचित्र संग्रहीत आहे.)