गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. नागरिक आणि वाहन चालकांना पाण्यातून वाट काढण्यास अडचण निर्माण होत आहे. आता पुढचे दोन दिवसही जोरदार पावसाचा इशारा हवाभान विभागाने दिला आहे. मुंबईत उद्या हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
कोकणाताही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि रायगडसाठी सुद्धा आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे आणि पश्चिमी वाऱ्यांनी जोर पकडला आहे त्यामुळे संपूर्ण कोकणात पाऊस असेल, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला
नेहमी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीड जिल्ह्यातही यंदा मान्सून मोठ्या प्रमाणावर बरसत आहे. जिल्ह्यात अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झालीय. तर जिल्ह्यातील सर्वच धरणांसह अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. जिल्ह्यातील खळवट लिंबगाव, चिंचवडगाव, हरिशचंद्र पिंपरी यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब भरल्याने अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झालीय. तर पुढील चार दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.