कितीही रणनीती आखाली तरी 2024 लाही मोदीच येणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे. या भेटीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी कितीही रणनीती आखाली तरी आजही मोदी आहेत आणि 2024लाही मोदीच येणार. नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात भाजप केंद्रात सरकार स्थापन करेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कोणी कुणाची भेट घ्यावी, यावर कुठलंही बंधन नाही, प्रत्येक जण आपापली रणनीती आखत असतं, पण कुणी कितीही रणनीती आखली तरी येणार तर मोदीच असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा, या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. ‘हे नेते तुमच्यातील संघटित शक्तीला स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापरत आहेत’, अशी भूमिका नक्षलवाद्यांनी मांडली आहे. यावर बोलताना फडणवीस यांनी या पत्रकाची गंभीर दखल घ्यायला हवी असं म्हटलं आहे. नक्षल विचार हा व्यवस्थेच्या विरोधात तरुणांना चिथावणी देणारा असतो. या पत्राची सत्यता तपासली पाहिजे, तसंच याची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणही फडणवीस यांनी केली आहे.

कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीत निघणाऱ्या पायी वारीसाठी राज्य सरकारने परवानगी द्यायला हवी होती. मुळातच पन्नास लोकांच्या उपस्थितीत वारकऱ्यांनी परवानगी मागितली होती. शिवाय मार्गात येणाऱ्या गावांचे ठरावही घेतले होते. त्यामुळे सरकारने पायी वारीला परवानगी द्यायला हवी होती, असंही फडणवीस यांनी म्हटलंय.

गेल्या दोन ते तीन दिवासंपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. याुळे मुंबईतील हिंदमाता इथं पाणी साचत आहे. यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. हिंदमाता इथल्या ड्रेनेज टनलला उशीराने परवानगी दिल्याने काम पूर्ण होऊ शकलं नाही असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. याला फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. या सरकारमधील नेते सकाळी उठून पहिलं वाक्य अमुक गोष्टींना केंद्र सरकार जबाबदार आहे अस बोलतात अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.