जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करतानाच आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहे, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.
संदीप देशपांडे यांनी मीडियाशी बोलताना हे स्पष्ट केलं. आम्ही दहीहंडी साजरी करणारच आहोत. आंदोलनावेळी आणि जन आशीर्वाद यात्रेवेळी कोरोना नसतो का? हिंदू आणि मराठी सणांनाच बंदी का? कोरोनाची तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला वाटलं की तिसरी लाट येणार आहे का?, असा सवाल देशपांडे यांनी केला. आमच्यावर कितीही केसेस टाका. आम्ही अस्वल आहोत. आमच्यावर खूप केस आहेत, असंही ते म्हणाले.
मुंबईच्या दादरमधील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र बंद आहे. तिथला बाण महापौर बंगल्यात गेल्यामुळे केंद्र बंद केलं आहे. तुमची निशाणी बाण आहे त्याच तरी भान ठेवा, नाही तर तुधमची निशाणी घड्याळ किंवा हात करा, असा टोला लगावतानाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही मीडियाशी संवाद साधला. एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटणं अवघड होतं. अनेकांना शाखाध्यक्ष होण्याची इच्छा आहे. त्यामुळे तीन ठिकाणी बैठक घेतली आहे. शाखा अध्यक्ष हा पक्षाचा कणा आहे. राज ठाकरे सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून शाखा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग अध्यक्ष हे पद ठेवण्यात आलेलं नाही. शाखाधक्ष महत्वाचा आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
तुम्ही आम्हाला सांगितलं महिन्यातून येत जा म्हणून आम्ही तयारीला लागलोय. आम्ही आमचे काम करत राहणार. कोणतंही सरकार कायम नसतं. लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सुज्ञ असतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
मुंबई, पुणे, नाशिक सगळीकडे बैठक होत आहे. लोकांना कळलं की मनसेने किती काम केले आणि आमचे काम किती मेंटेन केले. नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न मनसेने सोडवला. मुंबईमध्ये खेळ खेळायला गार्डन देखील कमी आहेत. सत्तेत आल्यावर सगळं करू, असं त्यांनी सांगितलं.