विठ्ठलनामाने अवघी पंढरी दुमदुमली ; शेतकऱ्यांवरील संकटे दूर कर : फडणविसांचे विठ्ठलाला साकडे

करोनाच्या निर्बंधमुक्तीनंतर होत असलेल्या पहिल्याच कार्तिकी वारीला पंढरीत चार लाखांहून अधिक वैष्णव भक्तांनी हजेरी लावली. टाळ, मृदंगांचा गजर आणि विठू नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. या वेळी त्यांच्यासोबत उत्तमराव माधवराव साळुंखे आणि कलावती साळुंखे (रा. शिरोडी खुर्द, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. फडणवीस यांनी गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन,महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

फडणवीस म्हणाले की, अनेक आक्रमणे होत असतानाही वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहणाऱ्यांच्या डोळय़ांचे पारणे फिटते. हा सोहळा वृिद्धगत व्हावा, अशी आपणा सर्वाची अपेक्षा आहे. पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेवून वारकरी संप्रदायाची परंपरा पाळून, स्थानिकांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न करता, कोणालाही विस्थापित न करता, अधिग्रहित केलेल्या जागेचा योग्य मोबदला संबंधितांना देऊन, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल.

नामदेव पायरी ही एक अभूतपूर्व व्यवस्था आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार व नामदेव पायरीचा विकास प्राधान्याने करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल आणि आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री आणि भाविक पंढरीत येतील तेव्हा त्यांना हा बदल दिसेल, असा विश्वास व्यक्त करून पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊ या व भागवत धर्माची परंपरा, वारकरी प्रथा – परंपरा, भक्तिभाव पुढच्या अनेक पिढय़ापर्यंत पोहोचविण्याचे काम करू या, असे ते म्हणाले.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर परिसरात चार लाखांपेक्षा अधिक भाविक आणि वारकरी आले होते. चंद्रभागा तीरासह संपूर्ण पंढरपूर विठ्ठल नामाने दुमदुमून गेले होते. चंद्रभागेत स्नान करून भाविक आणि वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. दर्शनरांग अनेक किलोमीटर दूपर्यंत गेली होती. प्रत्यक्ष मंदिरात विठ्ठलाच्या पददर्शनासाठी १२ ते १४ तासांचा अवधी लागत होता. दर्शनरांगेत हाल सोसूनही प्रत्येकाला विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली होती. सर्व मठ, धर्मशाळांमध्ये भजन-कीर्तनासह हरिनामाचा गजर सुरू होता. टाळमृदंगासह विठ्ठलाचा अखंड घोष चालू होता. चंद्रभागेच्या वाळवंटालगत ६५ एकर मैदानावरही वारकरी मंडळींच्या राहुटय़ा पडल्या होत्या. तेथे प्रशासनाने उत्कृष्ट व्यवस्था केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.