मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाच्या कारणामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मनसेची 21 मे नदीपात्रात ही सभा होणार होती.
मनसेकडून 21 मे ला नदीपात्रात होणारी सभा ही हवामानाचा अंदाज घेत पावसाचं कारण देत रद्द करण्यात आली आहे. तसेच मनसेने पुणे डेक्कन पोलिसांना सभा रद्द करण्याचं पत्रही देण्यात आलंय. राज ठाकरे ही सभा रद्द झाल्याने आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनसेप्रमुख अवघ्या काही दिवसांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याआधी राज ठाकरेंची सभा होणार का, याकडे लक्ष असणार आहे.
पुण्यामध्ये कधीकाळी मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते, एक आमदार निवडून आला होता. आजघडीला आमदार सोडा, शहरातील एकूण नगरसेवकांची संख्या अवघी 2 इतकी आहे. अशी परिस्थिती असताना पक्षाचे भवितव्य काय हा प्रश्न स्थानिक नेते आणि कार्यकर्ते दोघांनाही पडला आहे. त्यातच भाजपसोबत युती होणार का नाही यावर बरेच काही अवलंबून आहे.