नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या रईस शेखचा ताबा महाराष्ट्र एटीएसच्या नागपूर युनिटने घेतला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस शेखचा ताबा प्रोडक्शन वॉरंटवर घेण्यात आला आहे.
रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी करणारा दहशतवादी रईस अहमद शेख असादउल्ला शेख (28, रा. अवंतीपुरा) याला नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. एटीएसकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या नागपुरातील हस्तकाबाबतही माहिती घेण्यात येत आहे. रईस शेखने गेल्यावर्षी जुलै महिन्यात नागपुरात येऊन डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती होती. त्यानंतर त्याला काश्मीर पोलिसांनी अटक केली. रईसने पाकिस्तानमधील जैशच्या हँडलरच्या आदेशावरून नागपुरात रेकी केल्याचे समोर आले.
आता पुढील तपासासाठी एटीएसच्या नागपूर युनिटने रईसचा ताबा घेतला आहे. नागपुरात तो कोणाच्या सांगण्यावरुन आला होता. कोणती माहिती त्यांनी पाकिस्तानमधील आपल्या हँडलर पुरवली याचा तपास सुरु केला आहे. ओमरच्या संपर्कात आल्यानंतर त्याने आपल्याला (रईसला) नागपुरातील महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार, 13 जुलैला रईस हा विमानाने काश्मीरहून मुंबईला आला. तेथून विमानाने नागपुरात आला. त्याने नागपुरातील हस्तकाशी संपर्क साधला. परंतु, त्याचा संपर्क झाला नाही. त्यानंतर तो ऑटोरिक्षाने सीताबर्डी येथे आला. येथील एका हॉटेलमध्ये थांबला. 14 जुलैला तो आधी महालमधील संघाच्या मुख्यालयाची रेकी करायला गेला. परंतु, त्याला रेकी करता आली नाही. त्यानंतर तो रेशीमबाग मैदानात आला. येथून त्याने मोबाइलद्वारे स्मृती मंदिराचे चित्रीकरण केले.