परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची रविवारी येथे भेट घेतली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात संभाव्य चर्चेच्या काही दिवसआधी ही भेट झाली. या वेळी द्विपक्षीय संबंध, चिघळलेला युक्रेन संघर्ष, ऊर्जा समस्या, जी २० गट तसेच भारत-प्रशांत महासागरीय देशांमधील सद्य:स्थितीवर उभय नेत्यांत चर्चा झाली.
मंगळवारी मॉस्को येथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव यांच्या भेटीनंतर शनिवारी येथे युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी जयशंकर यांनी चर्चा केली होती. कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह येथे सुरू असलेल्या असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स (आसियान)-भारत मैत्री शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड या शिखर परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. जयशंकर हे धनखड यांच्या शिष्टमंडळात आहेत. येथे १७ वी पूर्व आशिया शिखर परिषदही होत आहे.
इंडोनेशियातील बाली येथे १५-१६ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या जी-२० गटाच्या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात होणाऱ्या संभाव्य द्विपक्षीय चर्चेच्या काही दिवस अगोदर जयशंकर आणि ब्लिंकन यांची भेट झाली. या विषयी जयशंकर यांनी एका ‘ट्वीट’मध्ये म्हटले, की अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्याशी युक्रेन, भारत-प्रशांत महासागरीय प्रदेश, ऊर्जा, जी-२० आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.
ब्लिंकन यांनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की उभय पक्षांतील सहकार्य वृद्धी व युक्रेनवरील रशियाच्या युद्धाचे दुष्परिणामांतून मार्ग काढण्यासाठी सुरू प्रयत्नांबाबत या वेळी विचारविनिमय झाला. जी-२० गटाच्या शिखर परिषदेसाठी भारताचे यजमानपद व अध्यक्षपदास अमेरिकेचे समर्थन आहे. जयशंकर यांनी येथे संयुक्त राष्ट्र प्रमुख अँतोनियो गुतेरेस, थायलंडचे परराष्ट्रमंत्री डॉन प्रमुद्विनाई तसेच कॅनडा, इंडोनेशिया, सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली.
बायडेन-मोदी भेटीची उत्सुकता
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी म्हटले आहे, की राष्ट्राध्यक्ष बायडेन व पंतप्रधान मोदींचे चांगले संबंध आहेत. बाली येथे होणाऱ्या जी-२० गटाच्या शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडेन पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक आहेत. आम्ही पुढील वर्षांची आतुरतेने वाट पाहत आहोत. पुढील वर्षी जी-२० गटाच्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद व यजमानपद भारत भूषवणार आहे. जो बायडेन या वेळी भारतभेटीवर येण्याची शक्यता आहे.