शहरातील किराडपुरा भागात रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीचे पर्यावसान दगडफेक यासह पोलिसांच्या गाडय़ांची जाळपोळ करण्यापर्यत झाल्याने पोलिसांना गोळीबार व अश्रुधुराचा वापर करत जमावाला पांगवावे लागले. यामध्ये तीन जण गंभीर जखमी असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दहा पोलीस कर्मचारीही जखमी आहेत. यातील एकास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हिंसाचारात १७ गाडय़ांची जाळपोळ झाली. रात्रभर अफवा पसरविल्या जात होत्या. पोलिसांनी ४०० ते ५०० जणांवर विविध कलमांन्वये दंगलीचे गुन्हे जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल केल्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
किराडपुरा भागात रामनवमीची तयारी सुरू असताना दुचाकी स्वारास गाडीचा धक्का लागल्याने वादास सुरुवात झाली. घोषणाबाजी करत तरुणांनी मंदिराजवळील काहींना मारले. हे तरुण औषधी गोळय़ांची नशा करत होते. त्यांनी मारहाण केल्याने सिडको भागातून आलेल्या तरुणांच्या जमावाने पुन्हा हाणामारी केली. या प्रकरणातील आरोपींना समजावून त्यांना घरी पाठवत असताना जमाव वाढत गेला. त्यांनी मग मंदिराच्या भोवताली असणाऱ्या पोलीस गाडय़ांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडाचा अक्षरश: खच पडला. त्यानंतर गाडय़ा जाळण्यासाठी जमाव पुढे येत होता. त्यांनी पोलिसांच्या आठ ते दहा गाडय़ांना आग लावली. यातील काही वाहने पूर्णत: जळाली.
मंदिरासमोरील कमान जळाल्याने राम मंदिरास समाजकंटकांनी नुकसान पोहोचविल्याची अफवा शहरात पसरली. मात्र, मंदिरात समाजकंटक घुसू नयेत म्हणून तेथे जात त्यांनी मंदिरातून शांततेचे आवाहन केले. दरम्यान जमावाला शांत करण्यासाठी एका मौलवींनाही बोलावण्यात आले. त्यांनीही शांततेचे आवाहन केले. पण जमाव शांत होत नव्हता. त्यांनी पोलीस गाडय़ांना लक्ष्य केले. अखेर जमाव शांत होत नसल्याने गोळीबार करत तसेच अश्रुधुराचा वापर करत पोलिसांनी जमावाला पांगवले. यामध्ये प्लास्टीक बुलेट आणि जिवंत काडतुसांचाही समावेश करण्यात आला. हिंसाचार करण्यापूर्वी जमावाने आधी खांबावरचे दिवे फोडले. मात्र, ‘सीसीटिव्ही’ चित्रण पाहून गुन्हेगारांना शोधून काढावे तसेच पोलीस उशिरा पोहोचल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.