अंध बांधवांना मदत व्हावी,प्रवास करताना त्यांना अडचणी येऊ नयेत,हे लक्षात घेऊन वेगवेगळी उपकरणं बाजारात आली आहेत. पण, ही स्टिक इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण, नाशिक जिल्ह्यातील सातवी आणि आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही स्टिक बनलीय. इगतपुरी तालुक्यातील महात्मा गांधी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी ही स्मार्ट ब्लाईंड स्टिक बनवलीय. त्यामुळे त्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
ही स्टिक स्मार्ट पद्धतीनं बनवण्यात आलीय. अंध व्यक्तींच्या मार्गात काही अडथळा असेल तर दीड-ते दोन फुटपूर्वीच ही स्टिक अलर्ट देईल. त्यामधील बझर वाजेल. त्यामुळे त्यांना धोका असल्याची जाणीव होणार आहे.
कशी सुचली कल्पना?
महात्मा गांधी शाळेतील शिक्षिका अनिषा कुलकर्णी यांनी संकल्पनेबद्दल बोलताना सांगितलं की, ‘अंध नागरिकांना फायदा होईल असं तुम्ही काय करु शकता? असा प्रश्न मी या विद्यार्थ्यांना विचारला होता. त्यावेळी त्यांना ही स्टिक बनण्याची कल्पना सुचली. त्यांनी या विषयावर तातडीनं कामही सुरू केलं.
ही काठी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाईप, अल्ट्रा सोनिक सेन्सर, बझर, मायक्रो कंट्रोलर, , 9 व्हॉल्टची बॅटरी या साहित्याचा उपयोग केला आहे. ही काठी बनविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल पवार, उपमुख्याध्यापक वाकलकर, पर्यवेक्षक ठाकरे, शिक्षक अविनाश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले, मुलांनी बनविलेल्या या काठीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ‘
नवं लक्ष्य!
‘आमच्यासाठी हा नवा प्रयोग होता. आम्हाला याबाबत जास्त माहिती नव्हती. या स्टिकमध्ये स्मार्ट यंत्रं वापरली तर नक्की फायदा होईल, हे आमच्या लक्षात आलं. आम्हाला ही स्टिक आणखी स्मार्ट बनवायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आणखी गोष्टींचा समावेश करता येईल. आमच्या यशात शिक्षकांचाही मोठा वाटा आहे. या कामामध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. ही स्टिक अधिक प्रमाणात बनवून ती अंध बांधवांना देण्याचं आमचं लक्ष्य आहे,’ अशी प्रतिक्रिया या टीममधील विद्यार्थी निखिल चव्हाण यानं दिली आहे.