मोरोक्कोविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने पोर्तुगालचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. गेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही तारांकित आघाडीपटू आणि कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोला अंतिम ११ मधून वगळण्याचा निर्णय पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नाडो सांतोस यांनी घेतला. पोर्तुगालचा संघ पराभूत झाल्याने सांतोस यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र रोनाल्डोला संघातून वगळल्याची खंत नसल्याचे सांतोस सामन्यानंतर म्हणाले.
‘‘रोनाल्डोला वगळण्याच्या निर्णयाची मला खंत वाटत नाही. मी संघाच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेतला. उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडविरुद्ध रोनाल्डोविना आमचा संघ चांगला खेळला. त्यामुळे मोरोक्कोविरुद्ध तोच संघ कायम ठेवला. परंतु, रोनाल्डोला वगळण्याचा निर्णय हा धोरणाचा भाग होता. संघाच्या हितासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतात. रोनाल्डो उत्कृष्ट खेळाडू आहे. एका सामन्यात संघातून वगळल्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही,’’ असे सांतोस म्हणाले.