क्रिकेटर नमन ओझाचे वडील विनय ओझा यांना अटक करण्यात आली आहे. बँक मॅनेजर असताना सव्वा कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात बैतूल पोलिसांनी विनय ओझा यांना अटक केली आहे. 2013 मध्ये बैतूलच्या मुलताई तहसीलच्या जोलखेडा गावात महाराष्ट्र बँक शाखेत विनय ओझा तैनात होते.
या गैरव्यवहारात आणखी एक व्यवस्थापक अभिषेक रत्नमचाही सहभाग होता. पोलिसांना त्यांना फसवणुकीसह अन्य कलमांत अटक केली होती. या सर्व प्रकारानंतर मुलताई पोलिसांनी विनय ओझा यांना न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने विनय ओझाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बनावट खाती तयार करून त्यात बनावट नावे व फोटो टाकून किसान क्रेडिट कार्डची रक्कम टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तब्बल 35 बनावट खाती तयार करून एकूण 1.25 कोटींचा गंडा घालण्यात आला होता. मुलताई पोलीस ठाण्यात विनय ओझा यांची चौकशी केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत 2013 मध्ये सुमारे 1 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी 2014 मध्ये तत्कालीन मॅनेजर विनय ओझा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 2014 मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून व्ही.के. ओझा फरार होते, ज्यांचा पोलीस 8 वर्षांपासून शोध घेत होते. आज पोलिसांनी विनय ओझाला अटक केली आहे.
कोण आहे नमन ओझा?
नमन ओझा हा भारतातील प्रसिद्ध क्रिकेटर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय नमनने 113 आयपीएल सामनेही खेळले आहेत.