भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये भीषण बस अपघाताचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस नेपाळच्या जनकपुर धामच्या दिशेने प्रवास करीत होती. दरम्यान बस रूपन्देहीच्या रोहिणी पुलावरुन खाली दरीत कोसळली. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नेपाळच्या जनकपूरहून भैरहवा येथे जात होती. मृतांमध्ये एक महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. मृतांपैकी 5 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघे बिहारमधील सीतामडी जिल्ह्याचे राहणारे होते. सासरा-जावईचं त्यांचं नातं होतं. हे दोघेही मजुरी करण्यासाठी तेथे जात होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस पुलाची रेलिंग तोडून दरीत कोसळली. दुर्घटनाग्रस्त बसचं नाव जिंदगी आहे.
या अपघाताची माहिती मिळताच नेपाळच्या गृहमंत्र्यांनी रुपंदेहीचे मुख्य जिल्हा अधिकारी ऋषी राम तिवारी, लुंबिनी राज्याचे मुख्य पोलिस उपमहानिरीक्षक नल प्रसाद उपाध्याय आणि रुपंदेही पोलिसांचे मुख्य पोलीस अधीक्षक रवींद्र रेग्मी यांना योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.