आज दि.६ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

आमदारांसाठी हॉटेल बूक; शिवसैनिकांची असणार करडी नजर

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवरुन जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतही बैठकांना वेग आला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. त्यातच राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपली आहे. त्यामुळे आता निवडणूक होणार आहे हे चित्र स्पष्ट झालं आहे.

महाविकास आघाडीनं मतं फुटू नये यासाठी सावध पाऊल उचललं आहे. त्यासाठी आमदारांकरिता हॉटेल बूक केलं आहे. हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिकांची नजर असणार आहे. शिवसेनेने देखील सर्व आमदारांना बॅग भरून वर्षावर बैठकीला येण्याचं सांगितलं आहे. वर्षावर मुख्यमंत्री सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

“…तेव्हा मोदी सरकारची अक्कल ठिकाणावर आली”, नुपूर शर्मा प्रकरणावरून नाना पटोलेंची टीका

भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद जगभरात उमटत आहेत. कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया या देशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामिक देशांच्या संघटनेने देखील या वक्तव्याची निंदा केली आहे. तसेच संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. त्यानंतर हा वाद आता वाढतच चालला आहे.

या प्रकरणावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपावर टीका केली आहे. त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “भाजपाच्या प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची भाजपाने पक्षातून हक्कालपट्टी केली आहे. ते दोघंही समाजात धार्मिक द्वेष पसरवत होते. महाराष्ट्रातही अशाप्रकारचे काही भाजपा नेते आहेत, जे रोज धार्मिक द्वेष पसरवत आहेत.”

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस; ८ जून रोजी वांद्रे न्यायालयात रहावे लागणार हजर

नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ८ जूनला राणा दामप्त्याला चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर दोषारोपपत्रही दाखल केले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणीच मुंबई पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

“माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच, ही भाजपाची सवय”, भास्कर जाधव यांचं टीकास्त्र

‘माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच, ही भाजपाची सवय’ असल्याची भास्कर जाधवांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली. भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसून देखील त्यांनी आपला एक जास्तीचा उमेदवार उभा केला आहे. भाजपाने राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रावर लादली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे : रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. आरपीआयला बीएमसी निवडणुकीत ३५ ते ३६ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच यापैकी आरपीआयच्या १८ ते २० जागा निवडून येतील, असा दावाही आठवले यांनी केला. यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असल्याचंही मत व्यक्त केलं. ते सोमवारी (६ जून) नवी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उत्तराखंड: पुष्कर सिंग धामी यांनी रचला इतिहास, ९२.९४% मते मिळवून दणदणीत विजय

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचा विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. धामी यांनी चंपावत मतदार संघातून विधासभेची पोटनिवडणूक लढवली होती. या विजयानंतर त्यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.उत्तराखंडमधील पोटनिवडणुकीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. धामी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा ५५,००० मतांनी पराभव केला आहे. २०१२ मध्ये सितरगंज पोटनिवडणुकीत विजय बहुगुणा यांनी मिळवलेला विजय हा सर्वात मोठा विजय मानला जात होता.  त्यांनी त्यावेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेद्वारावर ३९, ९५४ मतांनी विजय मिळवला होता. बहुगुणा त्यावेळी मुख्यमंत्री होते.

सांगलीतील चहा विक्रेत्याच्या लेकीची ‘सुवर्ण’ कामगिरी, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मिळवले यश

हरियाणातील पंचकुला येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करताना एकूण नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राला योगासनांमध्ये पाच, वेटलिफ्टिंगमध्ये तीन, सायकलिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले आहे. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये सांगलीची कन्या काजल सलगर हिचाही समावेश होता. तिने वेटलिफ्टिंगच्या ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. तिचे हे सुवर्णयश तिच्या कुटुंबासाठी विशेष महत्त्वाचे आहे. काजलचे वडील महादेव सलगर सांगलीतील संजय नगर परिसरामध्ये चहा-भजी विकण्याचे काम करतात.

नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याच्या बातम्यांवर RBI ची महत्वाची माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटेवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये दाखवल्या जात आहे. मात्र, या बातम्या खोट्या असून असा कोणताही विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत नसल्याची माहिती मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी दिली आहे. आरबीआयने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे.

प्रसारमाध्यमांच्या काही विभागांमध्ये अशा बातम्या येत आहेत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्याच्या चलनात आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचा चेहरा बदलून इतरांच्या चेहऱ्यावर बदल करण्याचा विचार करत आहे. मात्र, रिझव्‍‌र्ह बँकेत असा कोणताही प्रस्ताव नाही याची नोंद घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे.

ताडीपत्री घेणं सामान्यांना परवडेना; किलो मागे ३० रुपयांची वाढ

पावसाळच्या पार्श्वभूमीवर शेती आणि घराची डागडुजीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ताडपत्री खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांनी  साठवलेलं अन्नधान्यं सुरक्षित करण्यासाठी या ताडपत्रीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बाजारात ताडपत्रीच्या किमती 20 ते 30 रुपये प्रतिकिलोने वाढलेल्या आहेत.

स्थानिक शेतकरी योगेश बोरूडे म्हणतात की,बाजारात कांद्याला अद्यापही भाव वाढून मिळालेला नाही. यामुळे शेतात ठेवलेला कांदा सुरक्षित करण्यासाठी शेतकरी ताडपत्री खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये येत आहे. मात्र कांद्याच्या तुलनेत ताडपत्रीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.”

डॉक्टरांनी मृत घोषित केले; मात्र, मृताला जिवंत करण्यासाठी तासनतास चालला अंधश्रद्धेचा खेळ

एकविसाव्या शतकात  मानवाने खूप विकास केला आहे. मात्र, तरीही आजही समाजात अंधश्रद्धेची मुळे खोलवर रुजलेली आहेत. बिहारमध्ये एका ठिकाणी तेथील स्थानिकांनी अंधश्रद्धेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारच्या जमुई शहरात घडली.

बिहारमधील एका व्यक्तिच्या मृत्यूनंतर तासनतास त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बिहार राज्याच्या जमुई शहरातील लगमा परिसरातील आहे. गावातील मां काली मंदिर परिसराच्या भाविक जेथे थांबतात तिथे शेडमध्ये तरुणाचा मृतदेह ठेवून ग्रामस्थ व त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. 40 वर्षीय विपिन कुमार रावत यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता, असे सांगितले जात आहे.

वाशिममध्ये विहिरीतून गाळ उपसताना आढळले शिवलिंग, शिवभक्तांची एकच गर्दी

देशभरात सध्या ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा वाद पेटला आहे. आता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात एका विहिरीत गाळ उपसताना पुरातन शिवलिंग आढळल्याचा दावा केला जात आहे. विहिरीत शिवलिंग सापडल्याची बातमी शहरात वाऱ्यासारख्या पसरली असून शिवभक्तांनी एकच गर्दी केली आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर  कांरजा शहरातील टिळक चौकातील विहिरीचे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गाळ काढत  असताना एक भला मोठा दगड आढळून आला. याची नीट पाहणी केली असता सुमारे 300 ते 400 वर्ष जुने शिवलिंग असल्याचा दावा केला जात आहे.

शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आमच्यावर दबाव, राणा दाम्पत्यांचा ठाकरे सरकारवर आरोप

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात चुरस आता आणखी वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये थेट लढत रंगणार आहे. त्यामुळे अपक्षांच्या मतांना किंमत आली आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्यासाठी सरकारकडून आमच्यावर दबाव आणला जात आहे, असा आरोप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला आहे.

जो रूट मोडणार सचिनचा रेकॉर्ड, माजी कॅप्टनचा दावा

इंग्लंडनं लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा 5 विकेट्सनं पराभव केला.  जो रूटनं कॅप्टनसी सोडल्यानंतर इंग्लंडची ही पहिलीच टेस्ट होती. या टेस्टमध्ये रूटनं नाबाद 115 रन केले. त्याच्या शतकामुळे इंग्लंडनं 277 रनचं लक्ष्य चौथ्या दिवशी पूर्ण केले. या विजयासह यजमान टीमनं 3 टेस्टच्या मालिकेत 1-0 नं आघाडी मिळवली आहे. लॉर्ड्स टेस्टमधील रूटच्या कामगिरीनं ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मार्क टेलर चांगलाच प्रभावित झाला आहे. रूट महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा टेस्ट क्रिकेटमधील रेकॉर्ड तोडू शकतो, असा दावा त्यानं केला आहे.

‘स्काय स्पोर्ट्स’ शी बोलताना टेलर म्हणाला की, ‘जो रूट आणखी किमान 5 वर्ष नक्की खेळेल. त्यामुळे सचिनचा टेस्ट रेकॉर्ड त्याच्या आवाक्यात आहे, असं मला वाटतं. तो सचिनचा रेकॉर्ड तोडू शकतो. रूट गेल्या 2 वर्षांपासून जबरदस्त बॅटींग करत आहे. तो सध्या त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. तो फिट राहिला तर 15 हजारांपेक्षा जास्त रन करू शकतो.’ असा दावा टेलरनं केला आहे.

विश्वनाथन आनंदचा धडाका कायम, वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा केला पराभव

भारताचा अव्वल बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनं वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. नॉर्वेजियन चेस स्पर्धेतील क्लासिकल गटातील पाचव्या फेरीत आनंदनं कार्लसनचा पराभव करत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. यापूर्वी आनंदनं कार्लसनचा चेस ऑफ ब्लिट्ल (बुद्धीबळातील सर्वात लहान स्वरूप) पराभव केला होता.

आनंद आणि कार्लसन यांच्यातील मुख्य सामना 40 फेरीनंतर बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या ‘सडन डेथ’ फेरीत आनंदनं हा विजय मिळवला आहे. आनंदचा क्लासिकल गटातील हा चौथा विजय असून त्याचे आता 10 पॉईंट्स झाले आहेत. तर आनंदचा पारंपारिक प्रतिस्पर्धी कार्लसनचे 9.5 पॉईंट्स असून तो सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्वे चेस स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धीबळपटू सहभागी झाले आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.