मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण मेट्रो आता उल्हासनगरपर्यंत धावणार आहे. एमएमआरडीएने ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गाचा खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कल्याण ते खडकपाडा आणि खडकपाडा ते उल्हासनगर असा 7.7 किमीचा हा मार्ग असणार आहे. दोन टप्प्यात या मार्गाचे बांधकाम होणार आहे.
दरम्यान, याचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी लागेल. एमएमआरडीएच्या आगाची बैठकीत यासंबंथीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे तब्बल 337 किमीचे जाळे विणण्यात येत आहे.
सध्या मेट्रो 5 चे काम सुरू आहे. हा मार्ग 24.9 किमीचा आहे. यासाठी 8 हजार 416 किमी खर्च अपेक्षित आहे. तसेच या मार्गावर 17 स्थानकांचा समावेश आहे. यामुळे आता ठाणे ते कल्याण हा प्रवास अतिजलद होणार आहे.
ठाणे ते भिवंडी आणि भिवंडी ते कल्याण असा दोन टप्प्यात या मार्गाचे काम होणार आहे. पहिल्या टप्प्याचे 71 टक्के काम हे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. आता या मार्गाचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे.
या निर्णयाला महानगर आयुक्त एस. व्ही. श्रीनिवास यांनीही दुजोरा दिला आहे. उल्हासनगरमधील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.मेट्रो 5 चा विस्तार उल्हासनगरपर्यंत झाल्यास सीएसएमटी ते उल्हासनगर असा मेट्रो प्रवास करता येणार आहे. हे अंतर अतिजलद पद्धतीने पार करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचला जाणार आहे.