साईबाबांच्या दारी दर्शनासाठीचे बायोमेट्रिक पास बंद, एप्रिलपासून अभिषेक सुरू

जगभरातून शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी माथा टेकविण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी. आता साईंच्या दर्शनासाठी असलेले आणि भाविकांसाठी अतिशय त्रासदायक ठरणारे बायोमेट्रिक दर्शन पास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तसेच यापुढे आता शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी केवळ झटपट आणि व्हीआयपी पास सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. सध्या कोविडचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी 95 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातील 21 लाख रुपये हे ग्रामस्थांच्या यात्रा समिती कार्यक्रमासाठी देण्यात येणार आहेत. यंदाच्या रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो परंपरा येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे या उत्सवात खंड पडला होता.

दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांचे जगणे हैराण करून टाकले आहे. त्यात शिर्डी येथे सुरू असलेले अभिषेक आणि सत्यनारायण हे कोविड प्रतिबंधक नियमांमुळे बंद करण्यात आले होते. आता येत्या शुक्रवारी म्हणजेच 1 एप्रिलपासून हे अभिषेक, सत्यनारायण सुरू करण्यात येणार आहेत. मंदिरातील बॅरिकेड्स हटवण्यात येणार आहेत. सोबतच द्वारावती भक्तनिवास समोरची बाग आणि ग्रामदैवतांचे दर्शनही भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

शिर्डीतून जाणाऱ्या नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी साई संस्थानाकडून महाद्वार उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी यंत्रणांकडून लवकरच परवानगी घेण्यात येणार आहे. शिर्डीमध्ये अनेक भाविकांना त्रास देण्याच्या घटना घडतात. याची तक्रारही संस्थानाकडे आली आहे. अशा टवाळखोरांचा संस्थानच्या वतीने पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्त करण्यात येणार आहे, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.