आपल्याला गाडी रिपेरिंग करणारी व्यक्ती म्हटलं की एक कळकटलेल्या कपडयातील व्यक्ती समोर येते. आणि अनेकदा गाडी रिपेरिंग करणारे आपल्या डोळ्यासमोर पहिले पुरुष येतात. मात्र, पुण्यातील दिपाली या सगळ्याला अपवाद आहेत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात दिपाली धर्माधिकारी गेल्या 35 वर्षांपासून आपला व्यवसाय सांभाळत असून त्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा हा प्रवास कसा आहे पाहूया.
वडिलांचा पहिल्यापासून गॅरेजचा व्यवसाय होता. त्यांनीच मला गॅरेज मधली काम शिकवले होते. वडिलांना गॅरेज मधील काम करणं अवघड होऊन बसलं. काही शारीरिक कारणांमुळे त्यांना हे काम करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे मी वयाच्या 9 व्यावर्षांपासूनच गॅरेज मधील काम करण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती एकीकडे हलाखीची होत होती. तर दुसरीकडे मला स्वतःच्या पायावर उभ राहणं गरजेचं होतं. अशावेळी जर मी समाजाचा विचार केला असता तर माझ्या कुटुंबाला आधार देणारं दुसरे कोणीच नव्हतं. त्यामुळे मी या व्यवसायात उतरले. या कामासाठी मला माझ्या कुटुंबाकडून पूर्णपणे पाठिंबा मिळाला, असं दिपाली धर्माधिकारी सांगतात.
आज वयाच्या 51व्या वर्षी देखील मी या व्यवसायात चांगले काम करत असून माझ्याकडे येणारी सर्व ग्राहक गेल्या 35 वर्षांपासूनचे टिकून आहेत. या व्यवसायात मी माझ्या प्रत्येक ग्राहकाला चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे माझे ग्राहक टिकून आहेत. कोणाचा विश्वासघात न करणे हे ब्रीद मी नेहमीच पाळत आले आहे. भविष्यामध्ये मला मुलींसाठी देखील गॅरेजचे कोर्स सुरू करण्याचा मानस आहे. जर कोणत्या मुलीला गॅरेजचे कोर्स करायचे असतील तर त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क करावा असे दिपाली यांनी सांगितले.
35 वर्षांपूर्वी गॅरेजचा व्यवसाय महिलांनी चालवणं म्हणजे आश्चर्याची बाब होती. त्यावेळेस दिपाली यांना विविध समस्यांचा देखील सामना करावा लागला. यामध्ये मुख्यत्वे समाजाच्या नजरा आणि त्यांचे बोलणे त्यांना ऐकावे लागले. मात्र, त्या सर्वांशी त्यांनी सामना करून त्या या व्यवसायात नावाजल्या जात आहेत.