१५,९०० हून अधिक भारतीयांना
युक्रेन मधून परत आणले
ऑपरेशन गंगा अंतर्गत, आज २१३५ भारतीयांना युक्रेनच्या शेजारील देशांमधून ११ विशेष विमानांद्वारे परत आणण्यात आले आहे. यासह, २२ फेब्रुवारी रोजी विशेष उड्डाणे सुरू झाल्यापासून १५,९०० हून अधिक भारतीयांना परत आणण्यात आले आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली.
रशिया – युक्रेन वादात आगीत तेल
ओतू नका, अमेरिकेला चीनने दिला इशारा
रशिया – युक्रेन वादात आणखी आगीत तेल ओतू नका असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांनी युक्रेनबाबत विधान केले होते. स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व याच्या बाजूने कोणती राष्ट्र उभी राहतात, हे पाहूया, असं विधान ब्लिंकन यांनी केले होते. त्यावर चीनने आगीत तेल ओतून वाद वाढवू नका, असा इशारा दिला आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी आणि अमेरिकेचे परराष्ट्र ब्लिंकन यांनी फोनवरून शनिवारी चर्चा केली. त्यात चीनने हा इशारा दिला.
पूर्वी योजनांची घोषणा व्हायची,
पूर्तता नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपलयाकडे महत्त्वाच्या योजना पूर्ण व्हायला देखील फार वेळ लागायचा. या सुस्त वृत्तीमुळे देशाचं मोठं नुकसान झालं. आता आपल्याला वेगाने काम करायला हवं. यासाठी आमच्या सरकारने पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लान बनवला आहे. सरकार, मंत्रालयांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे अनेक वर्षांनंतर एखादी योजना जरी पूर्ण झाली, तरी ती आऊटडेटेड झालेली असते. पीएम गतिशक्ती मास्टर प्लान यावरच काम करेल. पुणे येथे झालेल्या मेट्रो रेल्वेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत
अजित पवारांचा राज्यपालांना टोला
अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल असूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो, असेही अजित पवार म्हणाले.
बीएसएफ जवानाचा गोळीबार
पाच जवान शहीद
अमृतसरच्या खासा गावात एका बीएसएफ जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) पाच जवान शहीद झाले आहे. ही घटना आज रविवारी घडली. अमृतसरमधील बीएसएफ मेसमध्ये कथित गोळीबार करणारा बीएसएफ कॉन्स्टेबल देखील मृत झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत चार बीएसएफ जवानांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
शिक्षक भरती घोटाळ्याची
व्याप्ती 240 कोटींपर्यंत
शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती 240 कोटींपर्यंत पोहोचली आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांपासून राज्य परीक्षा परिषदेचे संचालक ही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. परीक्षेच्या अंतिम यादीतील निम्म्या परीक्षार्थींकडून पैसे स्वीकारुन त्यांची नावे बनावट पद्धतीने टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आयएएस सुशील खोडवेकर याच्या अडचणीत वाढ झाली असून, त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शिवरायांच्या दोन ओळी मनसेच्या
प्रत्येक कार्यालयात पाठवणार : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक शाखेत, प्रत्येक कार्यालयात, सर्व शासकीय कार्यालयातही मी ती गोष्ट भेट म्हणून पाठवणार आहे. शिवरायांच्या एका पत्रातल्या दोन ओळी फ्रेम करून मी पाठवणार आहे. प्रत्येक शाखेच्या भिंतीवर ती गोष्ट लागली पाहिजे. कारण ती शाखा आहे, ते दुकान नव्हे. कसं वागावं, याबद्दल शिवरायांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्यातल्या या दोन ओळी आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले. कारभार ऐसे करावा, की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावणे अशा त्या दोन ओळी आहेत”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. “लोकांना त्रास देऊन, त्यांच्यावर अन्याय करून कोणतीही शाखा चालवायची नाही”, असं देखील त्यांनी नमूद केलं.
भारतीय महिला क्रिकेटपटूंचा
पाकिस्तान विरुद्ध विश्वविक्रम
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातव्या विकेटसाठी सर्वात जास्त धावांची भागेदारी करणाऱ्याचा मान पूजा आणि स्नेह या जोडीला मिळाला आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात या जोडीने हा विक्रम केलाय.त्यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत ११२ धावा केल्या. या तगड्या धावसंख्येमुळे भारतीय संघाने २४४ धावांपर्यंत मजल मारली. पूजा वस्त्रकरने ५९ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. तर स्नेह राणाने ५९ चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या जोरावर भारतासाठी ५३ धावा केल्या. पुढे दोन्ही खेळाडूंनी मैदानावर पाय रोवल्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना ही जोडी तोडणे अवघड झाले. शेवटी ५० षटकांचा खेळ संपूनही या जोडीला तोडण्यात पाकिस्तानला यश आले नाही.
श्रीलंका विरुद्ध पहिल्याच कसोटीत
टीम इंडियाचा दणदणीत विजय
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्याच कसोटी सामन्यात टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला आहे. टी 20 सामन्यात क्लीन स्वीप दिल्यानंतर आता मोहालीमध्ये कसोटी सामन्यातही विजय मिळवला आहे. सर जडेजाच्या झंझावाती खेळीनं टीम इंडियाला मोठं बळ मिळालं. तर आर अश्विननंही विक्रमी कामगिरी केली.
श्रीलंकेविरूद्धची पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. तब्बल 222 धावांनी टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला.
SD social media
9850 60 35 90