गेल्या वर्षभरापासून शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. तर रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात पाणी असून विद्युत पुरवठा खंडीत असल्याने पिकांचे नुकसान होत असून याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे. हे अस्मानी आणि सुलतानी संकट कायम असताना आता आगामी खरिपात शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभा राहत आहे. सध्याच्या युध्दजन्य परस्थितीमुळे रशियामधून होणारा खताच्या पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे दरात दुपटीने वाढ झाली आहे. भारत सरकारला आता नव्या पर्यांयांचा शोध घेतल्याशिवाय दुसरा मार्गच नाही. खरिपातील खताचा प्रश्न मिटवण्यासाठी आतापासूनच खताची आयात केली तरच गरज भागणार आहे. अन्यथा याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे.
देशात खतनिर्मितीचे प्रमाण खूपच कमी आहे. यासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या माल देखील आयात करावा लागत आहे. शिवाय कच्चा माल उपलब्ध नसल्याने मध्यंतरीच खताच्या दरात वाढ झाली होती. देशाच्या एकूण खत आयातीपैकी रशिया, बेलारुस आणि युक्रेन या तीन देशातून 20 टक्क्यांपर्यंत खत आयात होते. दरवर्षी 70 लाख टन डीएपी, 50 लाख टन पोटॅशची आयात केली जाते. यापाठोपाठ कॅनडामध्ये पोटॅशचे उत्पादन होते. मात्र, येथील उत्पादनही वाढेल असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे खत निर्मितीमधील अडचणी आणि आयातीवर होणारा परिणाम या बाबी यंदा नुकसानीच्या ठरणार आहेत. शिवाय खताचा पुरवठा झाला तरी दरात मात्र, दुपटीने वाढ होणार असल्याचे खते विक्रेत्ये उत्तम अग्रो यांनी सांगितले आहे.
सध्याचा विचार केला तर नेहमीच्या तुलनेत केवळ 20 ते 30 टक्के खताचा साठा भारताकडे आहे. शिवाय खरिपातील पेरण्या जरी जून उजाडल्यावर होत असतील तरी खताची मागणी ही 15 मे नंतरच सुरु होते. त्यामुळे खताचे नियोजन करण्यासाठी केवळ दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. खरीप हंगामासाठी लागणारे पोटॅश, सयुक्त आणि विद्राव्य खते ही रशिया, युक्रेन आणि बेलारुसमधूनच आय़ात होतात. त्यामुळे बिकट परस्थिती ओढावण्याअगोदर नियोजन करणे गरजेचे आहे.
कठीण परस्थितीमध्ये खतांची आयात झाली तरी दरवाढीतून सुटका नाही. गतवर्षीच कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे खतांच्या दरात वाढ झाली होती. शिवाय अगोदर देशांतर्गतची गरज आणि नंतरच निर्यात असेच धोरण सर्व देशांनी केले आहे. चीनने निर्यातच थांबवली होती तर अन्य देशांनी निर्बंध लादलेले आहेत. अशा अवस्थेत जरी खताची आयात झाली तरी दर दुपटीने वाढतील असा अंदाज कृषी अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.