उस्मानाबाद-बालसुधार गृहातील बालकांना बनावट आधारकार्डच्या आधारे पळवून नेणाऱ्या आंतरराज्य तस्कर टोळीचा उस्मानाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 बनावट आधारकार्ड जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद बालसुधारगृहातून मुलांचे आई-वडील असल्याचे भासवून मुलांची तस्करी केल्या जात असल्याचा प्रकार उघड आहे. आंधप्रदेशमधील एक टोळी बालसुधारगृहातील मुलांना घेण्याच्या बहाण्याने आली होती. या टोळीतील 3 जणांना अटक करण्यात आली आह. त्यांच्याकडून 5 बनावट आधार कार्ड आणि 5 मोबाईल जप्त केले आहेत.
चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली अल्पवयीन मुले बालसुधार गृहात ठेवली जात होती. या मुलांचे पालक असल्याचा दावा ही टोळी बोगस आधारकार्ड बनवून करीत होती. त्यानंतर त्या बालकांना घेऊन पळवून जात होती. उस्मानाबाद शहरातील सांजा चौकातील बालगृहातील मुलाला बनावट आधार कार्ड ओळखपत्र आणि जन्मदाखला घेऊन आई म्हणून एक महिला मुलाला घेण्यासाठी आली.
त्या महिलेसोबत असणाऱ्या 2 पुरुषांवर पोलिसांनी संशय आला म्हणून ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. मुलांना घेऊन गेल्यानंतर त्यांच्याकडून भीक मागण्यास सांगायचे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
टोळीतील गुन्हेगार आणि बालके ही आंध्रप्रदेश राज्यातील करनूल येथील आहेत. याआधी किती मुलांना घेऊन गेले, किती मुलं बेपत्ता झाली. याचा तपास आता पोलीस करत आहे. अधिक तपास करण्यासाठी पोलिसांची पथके आंध्रप्रदेशमध्ये रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.